"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 20:08 IST2025-10-20T20:06:21+5:302025-10-20T20:08:44+5:30
वागणूक चुकीची असल्याने भाषा चुकीची वापरली. शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे. त्यांना आत्महत्या करायची वेळ आली आहे असं कडू यांनी म्हटलं.

"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
बुलढाणा - शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना मारा, कापा असं विधान शेतकरी नेते बच्चू कडू यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरून आता बच्चू कडू यांनी त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहत आमदाराला कापा बोललो तर राग येतो, मग रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही असा सवाल उपस्थित केला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी रोज मरतो त्याचा तुम्हाला राग येत नाही. आम्ही फक्त बोललो तर संताप व्यक्त करता. शेतकऱ्यांना रोज लुटले जाते त्याचा संताप नाही. मते तुम्ही आमची घेणार आणि काळजी घ्यायची आमदाराची...आमदारांना चोपावेच लागेल, चोपल्याशिवाय आंदोलन होणार नाही. ३ हजाराने सोयाबीन विकावे लागते, ६ हजाराने कापूस विकावा लागतो, का कुणी बोलत नाही. पंजाबमध्ये ९५ टक्के शेती माल हमीभावाने खरेदी केला जातो. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचा माल २२००-१५०० ने विकावा लागतो. या लोकांची पूजा करायची का? वेळ आली तर आमदारांना मी चोपणार असं त्यांनी इशारा दिला.
तसेच आम्ही भान ठेवण्यापेक्षा तुम्ही भान ठेवा. वेळ आल्यावर आम्ही काय असेल ते करू. पहिले संजय शिरसाट यांना घेऊ..वागणूक चुकीची असल्याने भाषा चुकीची वापरली. शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे. त्यांना आत्महत्या करायची वेळ आली आहे. संत्रा, सोयाबीन, कापूस गेला देवाभाऊंनी शेतकऱ्यांची काळजी घ्यावी असा सांगत बच्चू कडू यांनी संजय शिरसाट आणि नितेश राणेंचा समाचार घेतला.
काय म्हणाले होते बच्चू कडू?
रोज १०-१२ शेतकरी आत्महत्या करतायेत. सरकार ऐकायला तयार नाही. त्यामुळे जर आत्महत्या करायची असेल तर स्वत: मरण्यापेक्षा आमदारांना कापा ना असं विधान बच्चू कडू यांनी बुलढाणा येथील सभेत केले होते. मात्र बच्चू कडू यांचे हे विधान लोकशाहीत योग्य नाही. कापा, चोपा ही भाषा मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीने बोलणे चुकीचे आहे असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं होते. तर एखादे विधान करत असताना आपण काय बोलतोय याचे भान ठेवले पाहिजे. शेतकरी अडचणीत आहे त्याला आता खून करायला लावणार का, सरकारविरोधात काय बोलायचे हा त्यांचा अधिकार आहे. शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करावा त्यापेक्षा तुम्हीच करा ना असा संताप संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.