“उत्तर द्या, ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही?”; बच्चू कडूंचा सरळ प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 16:28 IST2023-11-09T16:26:37+5:302023-11-09T16:28:40+5:30
Bachchu Kadu News: एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

“उत्तर द्या, ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही?”; बच्चू कडूंचा सरळ प्रश्न
Bachchu Kadu News: आताच्या घडीला राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. तसेच अंमलबजावणी संचालनालयाकडून अनेक नेत्यांवर कारवाई केली जात आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी ईडी कारवायांबाबत सरळ प्रश्न विचारला आहे.
समाजाला हुशार करण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची असते. पण राजकीय नेते चुकले तर ताळ्यावर आणले पाहिजे. जे काही सत्य आहे, ते तुम्ही मांडले पाहिजे. राजकीय नेते रुसले तर तुमचे काहीच बरं-वाईट होत नाही. तुमच्यामागे ईडीची चौकशीही लागू शकत नाही. ईडी लागणार नाही, अशाप्रकारे काम करत राहा, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही?
आता भाजपसोबत आहे. पण भाजपवाल्यांना माझा सरळ प्रश्न आहे. ईडीने भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही? त्यांनी याचे उत्तर द्यायला हवे. एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो. ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट किंवा काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी केली जाते. पण भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी होत नाही. शिंदे गटाच्या नेत्यांमागे ईडीची चौकशी सुरू होती, पण ते आता सत्तेत आले आहेत, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.
दरम्यान, मराठा आरक्षणावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या मुदतीवरूनही एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे. यावर बोलताना, मनोज जरांगे पाटील सरकारला मुदत वाढवून देऊ शकतात. मराठा आरक्षणाबाबत सरकारने १५ दिवसांचा प्रगती अहवाल दाखवावा. मग मनोज जरांगे यांच्यासोबत बैठक घ्यावी. काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असे मनोज जरांगे यांना वाटले, तरच ते वेळ वाढवून देतील, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.