बच्चू कडू करणार जोरदार बॅटिंग, 'प्रहार जनशक्ती'ला मिळालं निवडणूक चिन्ह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 16:57 IST2024-08-16T16:49:05+5:302024-08-16T16:57:35+5:30
Bacchu Kadu : यापूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अनेकदा कप बशी चिन्हावर निवडणूक लढवली होती.

बच्चू कडू करणार जोरदार बॅटिंग, 'प्रहार जनशक्ती'ला मिळालं निवडणूक चिन्ह!
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीची तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. यातच बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेसाठी चांगली बातमी समोर आली आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक आयोगाकडून बॅट हे चिन्ह मिळालं आहे. यापूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अनेकदा कप बशी चिन्हावर निवडणूक लढवली होती.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवडणूक चिन्हासाठी अर्ज केला होता. निवडणूक आयोगाकडून बॅट हे अधिकृत निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळं आता आगामी विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे संभाव्य उमेदवार बॅट या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी महायुतीमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. बच्चू कडू यांनी विधानसभेला जास्तीत जास्त उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, तिसऱ्या आघाडीचीही त्यांनी तयारी सुरू केली आहे. तसंच, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी बंड पुकारलं होतं. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाला शिट्टी हे चिन्ह मिळालं होतं.
दुसरीकडे, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगानं गॅस सिलेंडर हे नवं चिन्ह बहाल केलं आहे. याआधी वंचित बहुजन आघाडीला वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनेही जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं राज्यातील विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी, ज्या मतदार संघात आपले उमेदवार उभे करेल, त्यांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळणार आहे.