सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 11:35 IST2025-10-30T11:33:46+5:302025-10-30T11:35:50+5:30
Bacchu Kadu, Farmer Protest news: आंदोलनाच्या मूळ मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे शेतकरी आंदोलनाचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
मुख्यमंत्र्यांनी चर्चेला मुंबईत बोलविले आहे. मी आणि सहा जणांचे शिष्टमंडळ जात आहोत. काही निर्णय होतील, घेतले जातील ते कोणाला पटणार नाहीत, कोणाला पटतील. आपण आंदोलन उभारले आहे. ते सोपे नाही. परंतू, आंदोलनाच्या मूळ मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे शेतकरी आंदोलनाचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी भेट देत पाठिंबा दिला. मी इथे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आलो आहे. सरकारने टाकलेला डाव कसा मोडायचा, यासाठी प्रतिडाव टाकावा लागेल. आमचेही आंदोलन होते. तुम्ही उभे आयुष्य शेतकरी आंदोलनात खर्च केले आहे. मुंबईच्या बैठकीबाबत मला माहिती नाही. मी त्यात पडणार नाही. जा किंवा नका जाऊ असे मी सांगणार नाही. मी अंतरवालीची बैठक रद्द केली. काल मला खूप वाईट वाटले, पहिल्याच दिवशी सरकारने कोर्टाचा डाव टाकला. कडू म्हणत होते तुम्हीही चला मुंबईला, मी म्हटले नाही. त्यांना इकडे यायला काय झालेय, असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला.
आज सायंकाळी सात वाजता बच्चू कडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. या आंदोलनाच्या संपूर्ण कर्जमाफीसह २२ प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे. शेतकरी आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुमारे दहा हजारांहून आंदोलक सहभागी झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी बुधवारी जनतेला होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेत स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कडू व इतर आंदोलकांना वर्धा रोड व इतर सर्व रस्ते तातडीने मोकळे करण्याचा आदेश दिले होते.