रहाटणी : मागील काही दिवसांपासून शहरात पावसाने चांगलीच सुरुवात केल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. मात्र, रहाटणी परिसरातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याने नागरिक व वाहनचालक कमालीचे हैराण झाले होते. वाहन चालविताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते. ‘रस्ते झाले जलमय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दाखल घेत महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधित विभागाने रहाटणी परिसरातील खड्डे बुजविले. रहाटणी येथील रामनगर १, गोडांबे कॉर्नर, नखाते वस्ती चौक यासह परिसरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे चालणे किंवा वाहन चालविणे अवघड झाले होते. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचल्याने अंदाज न आल्याने अपघात होत होते. अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करूनही पालिका प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नव्हते. मागील काही दिवसांपूर्वी गोडांबे कॉर्नर चौकात मोठा खड्डा पडला होता. तो व्यवस्थित बुजविला नसल्याने तेथे पुन्हा मोठा खड्डा पडला व त्यात अनेक दुचाकी पडून अपघात झाले. गुरुवारी सकाळपासून पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने पालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने परिसरातील खडे बुजविण्याची मोहीम हाती घेऊन परिसरातील अनेक खड्डे बुजविले. त्यामुळे परिसरातील नागरिक व वाहनचालक समाधान व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)
महापालिका प्रशासनाला जाग
By admin | Updated: August 5, 2016 01:24 IST