सहायक आयुक्त अडकले
By Admin | Updated: December 16, 2014 01:11 IST2014-12-16T01:11:09+5:302014-12-16T01:11:09+5:30
अन्न व औषध प्रशासनाचा सहायक आयुक्त तसेच लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने लाच घेताना जेरबंद केले. ज्ञानदेव लक्ष्मण कुरकुटे (वय ५५, स. आयुक्त) आणि

सहायक आयुक्त अडकले
लिपिकही पकडला : अन्न व औषध प्रशासनाला हादरा
नागपूर : अन्न व औषध प्रशासनाचा सहायक आयुक्त तसेच लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने लाच घेताना जेरबंद केले. ज्ञानदेव लक्ष्मण कुरकुटे (वय ५५, स. आयुक्त) आणि अजय लक्ष्मण खडसे (वय ३६, लिपिक) अशी आरोपींची नावे आहेत. मेडिकल स्टोर्सच्या परवान्यासाठी सहायक आयुक्ताने पाच हजाराची तर लिपिकाने एक हजाराची लाच मागितली होती. फहिमुद्दीन काझी हे टेका नाका परिसरात राहतात. त्यांना मेडिकल स्टोर्स सुरू करायचे आहे. परवाना मिळावा म्हणून त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे अर्ज केला होता. आज काझी कुरकुटेकडे गेले. त्यांनी काझीला ‘पाकिट लाये क्या’, असे विचारले. काझीने ‘कशाचे पाकिट’, असे विचारले असता कुरकुटेने पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. तीन हजारात सौदा पक्का केला. त्यानंतर टंकलेखक खडसेने एक हजाराची लाच मागितली. (प्रतिनिधी)
झटपट सापळा, फटाफट कारवाई
छोट्याशा कामासाठी अधिकारी अन् कर्मचारी लाच मागत असल्यामुळे आज दुपारी १ वाजता काझी यांनी एसीबीच्या कार्यालयात तक्रार नोंदवली. अधीक्षक प्रकाश जाधव यांनी लगेच कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सायंकाळी ५ च्या सुमारास या दोघांना त्यांच्याच कार्यालयात लाच स्वीकारताना जेरबंद करण्यात आले.
साताऱ्यातील निवासस्थानीही झडती
आरोपी कुरकुटे हा वर्ग १(क्लास वन)चा अधिकारी असून, तो गुरुवारपेठ सातारा येथील रहिवासी आहे. खडसे मूळचा अमरावतीचा रहिवासी आहे. लाच घेताना पकडल्यानंतर कुरकुटेच्या नागपूर आणि साताऱ्यातील निवासस्थानी एसीबीच्या पथकाने झडती सुरू केली. त्यात नेमके काय मिळाले, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही.