नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लीम कुटुंबाला मारहाण; ४ वर्षाच्या मुलीवर चहा फेकल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:52 IST2025-03-12T12:51:05+5:302025-03-12T12:52:26+5:30

या घटनेतील पीडित अशरफ शेख त्यांच्या पत्नीला घेऊन विधान भवनाबाहेर पोहचले होते.

Ashraf Shaikh on Nitesh Rane: Nitesh Rane party workers beat up Muslim family; Accused of throwing tea on 4-year-old girl | नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लीम कुटुंबाला मारहाण; ४ वर्षाच्या मुलीवर चहा फेकल्याचा आरोप

नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लीम कुटुंबाला मारहाण; ४ वर्षाच्या मुलीवर चहा फेकल्याचा आरोप

मुंबई - बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख यांचा खून केल्याचं प्रकरण चर्चेत असताना आता मंत्री नितेश राणे यांच्यावरही गंभीर आरोप लावण्यात आला आहे. एका मुस्लीम कुटुंबाला नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा आरोप आहे. हे कुटुंब आज विधान भवनासमोर न्याय मागण्यासाठी आलं होते. नितेश राणेंचा राजीनामा घ्या अशी मागणी कुटुंबाने केली आहे. राणे यांच्या कार्यकर्त्यांकडून या मुस्लीम कुटुंबाला जय श्रीराम म्हणण्यासाठी दबाव टाकला गेला, त्यातून ही मारहाण झाल्याचं कुटुंबाने म्हटलं.

या घटनेतील पीडित अशरफ शेख त्यांच्या पत्नीला घेऊन विधान भवनाबाहेर पोहचले होते. त्याठिकाणी माध्यमांशी बोलताना अशरफ शेख यांच्या पत्नी म्हणाल्या की, आम्ही कणकवलीला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो, तिथून परतताना पनवेल इथं ही घटना घडली. तिथे सगळी कॉलेजची ३०-३५ मुले होती त्यात मी एकटी हिजाब घालून होते. ते आम्हाला बघून जय श्रीराम घोषणा देत होते. त्यानंतर त्यांनी तुम्हीही जय श्रीराम बोला म्हणून आमच्यावर दबाव टाकला. त्यानंतर तिथे मला आणि नवऱ्याला मारहाण केली. आम्ही पनवेलला तक्रार केली असं त्यांनी सांगितले. 

तर मडगाव एक्सप्रेस ट्रेनमध्ये जय श्रीराम बोलण्यासाठी आमच्यावर दबाव आणला, आम्ही बोलण्यास नकार दिला तेव्हा त्या मुलांनी माझ्या ४ वर्षाच्या मुलीवर चहा फेकली. मला आणि बायकोला मारहाण केली. याची तक्रार ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली. रेल्वेने पनवेलमध्ये मदत मिळेल सांगितले, पण तोपर्यंत सगळे आरोपी पळून गेले. पनवेलची केस कणकवली येथे ट्रान्सफर करण्यात आली. कणकवली आम्ही जबाब द्यायला गेलो तेव्हा तिथे नितेश राणेंसमोर कार्यकर्त्यांनी आम्हाला मारले. आमच्या घरी येऊनही आम्हाला मारहाण करण्यात आली. तालुका अध्यक्ष सोनू सावंत, वरवडे गावचा उपसरपंच अमोल बोंद्रे असे अनेक कार्यकर्ते होते त्यांनी मारल्याचं अशरफ शेख यांनी दावा केला. टीव्ही ९ ला त्यांनी मुलाखत दिली. 

दरम्यान, आम्हाला न्याय हवा. आमच्यासोबत जो अन्याय झाला त्यात न्याय द्या. २५ जानेवारी २०२४ ला घटना घडली होती. आरोपींना अटकच केली नाही. नितेश राणेंचा राजीनामा घ्या आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी अशरफ शेख यांच्या कुटुंबाने केली आहे. त्यात ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: Ashraf Shaikh on Nitesh Rane: Nitesh Rane party workers beat up Muslim family; Accused of throwing tea on 4-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.