उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 08:56 IST2026-04-13T08:52:52+5:302026-04-13T08:56:12+5:30
Asha Bhosle Death News: शनिवारी रात्री उशीरा अत्यवस्थ स्थितीत आशाताईंना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी आली. अवघी रात्र अस्वस्थतेत सरली आणि रविवार उगवला, तो त्यांच्या वियोगाची बातमी घेऊनच.

उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
मुंबई - चांदण्यात फिरताना प्रियकराने हात धरला म्हणून मनाशी दाटणारी नाजूक हुरहूर असो, हरवलेल्या प्रीतीच्या दंशाने विव्हल होऊन 'एकसौ सोला चांद की राते' परत करायला निघालेली विफलता असो, मल्मली तारुण्याची दुलई पांघरून पहाटे पहाटे प्रियकराच्या मिठीत शिरण्याचे थेट आव्हान असो, नशेचे दम भरून शरीरासह सारे काही भिरकावून देण्याची बेभान झिंग असो की आयुष्यभर भोगलेल्या वेदना ओसंडून ओठावर हसू आल्याची दुखरी कबुली; स्त्री-जन्माच्या वाट्याला येणाऱ्या हरेक क्षणाला जिवंत करणाऱ्या अजरामर आवाजाची सम्राज्ञी अखेरचा निरोप घेऊन पृथ्वीतलावरून निघून गेली आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
शनिवारी रात्री उशीरा अत्यवस्थ स्थितीत आशाताईंना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी आली. अवघी रात्र अस्वस्थतेत सरली आणि रविवार उगवला, तो त्यांच्या वियोगाची बातमी घेऊनच. तब्बल आठ दशकांच्या सुरेल कारकीर्दीत करोडो रसिकांची हृदये घायाळ करत राहिलेली आशा भोसले नावाची लखलखती ऊर्जा अखेर हृदय बंद पडून मंद होत जावी, हा नियतीचा क्रूर डाव म्हणावा की वाटेतल्या काट्याकुट्यांची पर्वा न करता खमक्या स्वाभिमानाने रंगवत नेलेल्या एका सुरेल मनस्वी डावाची सांगता?
..पण हे असे कसे?
आयुष्यातल्या हरेक प्रसंगात सोबत करणारी त्यांची गाणी आजन्म सोबत असताना आशाताई गेल्या असे तरी का म्हणावे आपण?
दगडाच्या देवाला पाझर फुटेल अशी प्रार्थना, ऐन जवानीत फुरफुरणारी मदमस्त लावणी, अवखळ मिश्कील प्रणयगीते, प्राण कंठाशी आणणारा विरहाचा कल्लोळस्वर, हजारो घाव सोसून जर्जर झालेल्या आत्म्याचा आर्त टाहो, अल्लड बाळाला शांतवणारी अंगाई, अंगात वीज खेळवणारी फडकती क्लब-साँग्ज, मध्यरात्री झरणाऱ्या एकट्या अश्रूंना सोबत करणाऱ्या मऊ मधाळ गझला; हे सारे-सारे मनमुक्तपणाने उधळून शांत झालेल्या आशाताईंचा देह वयोमानानुसार अनंतात विलीन झाला एवढेच... पण त्यांनी रंगवलेल्या मैफिलीत तर त्या असतीलच! ‘‘इस अंजुमनमें आपको आना है बारबार’’ असे त्याच नव्हत्या का म्हणाल्या? त्या जीवघेण्या आमंत्रणाच्या कातील मदहोशीची धुंदी वियोगाच्या बातमीने आणखी गडद होईल आणि डोळ्यातले पाणी खळणार नाही, हे मात्र खरे!
त्या दोघी इथे होत्या तेव्हा लोकांनीच दोघींमध्ये वणवे पेटवले. आता त्या दोघी तिथे शांतपणे एकमेकींना भेटतील... स्वर्गातल्या त्या जादुई दुनियेत आता लतासोबत आशाही असेल; पण या दोघींच्या विरहाने आक्रंदणाऱ्या करोडो रसिकांच्या अश्रूंना आज पारावार नसेल..
लता मंगेशकर नावाच्या स्वरवृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात स्वतःसाठी वेगळी जागा तयार करणाऱ्या आशाताईंनी पार्श्वगायनात केलेल्या अनेकविध प्रयोगांची गणती करणे खरोखर मुश्किल. भारतातील अनेक भाषांमध्ये त्या गायल्याच शिवाय पश्चिमी संगीताची जादूही त्यांनी विलक्षण फिरत असलेल्या आपल्या गळ्यावर बेमालूम खुबीने चढवली. मराठी भावगीतांसह अन्य गैरफिल्मी प्रकारात त्यांनी केलेली मनसोक्त मुशाफिरी त्यांच्यातल्या प्रयोगशील गायिकेची सामर्थ्यस्थळे दर्शवणारी!
व्यक्तिगत आयुष्यात मांडलेले डाव मोडले, काही नाती तुटली, काही तोडावी लागली, जोडली ती जुळली नाहीत, आप्तांचा वियोग सोसला, पोटच्या मुलांचे अकाली मृत्यू पाहावे लागले; हे सारे दुःख आशाताईंनी हिमतीने पचवले आणि त्या कल्लोळातून उगवलेले त्यांचे गाणे अधिकच प्रगाढ, प्रगल्भ होत गेले. आता यापुढे उजव्या कानाच्या मागे मानेवर झुलणारे फुल माळून मनमुक्त हसत मैफिलीत रंगलेल्या, आयुष्यातले कडूगोड अनुभव मोकळेपणाने सांगताना कधी हातचे काही न राखणाऱ्या आशाताई दिसणार नाहीत हे खरे, पण पहाट होईल तेव्हा त्यांचीच भूपाळी ऐकू येईल... कुणावर जीव जडेल तेव्हा काळजात नेमके काय फुलते आहे हे त्यांची प्रणयगीते समजावतील... मध्यरात्रीचा शृंगार त्यांच्यांच गाण्यांनी सजेल... मन मोडेल, काटा घुसेल तेव्हा त्याच फुंकर घालायला येतील... आणि सगळे आयुष्य विफल आहे असे वाटून डोळे भरून येतील तेव्हा आशाताईंचे गाणेच आपल्याला कुशीत घेईल...म्हणजे त्या असतीलच. इथेच. आपल्याबरोबरच.
स्वरांची चांदणी का मालवली? ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी काय सांगितले?
ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे काही अवयव निकामी (मल्टीऑर्गन फेल्युअर) झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे इंटर्नल मेडिसीन तज्ज्ञ डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली. शनिवारी संध्याकाळी त्यांची घरीच तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शनिवारी रुग्णालयात दाखल करताना त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना छातीच्या संसर्गाचा त्रास होता. त्याचा हृदयावर ताण येऊन त्यांना घरीच हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यांना सुरुवातीला आकस्मिक विभागात त्यांना सीपीआर देण्यात आला. त्याना नंतर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेडिसिन, हृदयविकार आणि विविध वैद्यकीय शाखेतील तज्ज्ञांनी भेट देऊन उपचारासाठी आणखी काय करता येईल याची चाचपणी केली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्यानंतर त्या वैद्यकीय उपचाराला कशा पद्धतीने प्रतिसाद देतील यावर डॉक्टरचे पथक लक्ष ठेवून होते. मात्र, रविवारी दुपारी त्यांचा मल्टीऑर्गन फेल्युअर होऊन मृत्यू झाला. डॉक्टरांनी भोसले कुटुंबीयांना त्यांच्या निधनाची माहिती दिली.
संगीत जगतात मोठी पोकळी, त्यांची गाणी जीवनात सदैव गुंजत राहतील
आशा भोसले यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आशा भोसले यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे अनेक आठवणी आपल्या मनात दाटून आले आहे.
- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
आशाताईंची गाणी लोकांच्या जीवनात सदैव गुंजत राहतील. आशा भोसले यांच्या विलक्षण सांगीतिक प्रवासाने भारतीय सांस्कृतिक वारसा समृद्ध केला आणि जगभरातील असंख्य हृदयांना स्पर्श केला. त्या पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
लोकांच्या मनांत आवाजाच्या रुपाने त्या कायम अमर राहतील. आवाज आणि शैलीतून आशा भोसले यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दुखद प्रसंगी मंगेशकर कुटुंबीयांबद्दल संवेदना. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते
आशा भोसले केवळ देशातीलच नाही तर संगीतविश्वातील सिद्धहस्त आणि प्रतिभासंपन्न पार्श्वगायिका होत्या. आपल्या अवीट स्वरांनी, विविध संगीत प्रकार लीलया गाण्याच्या
क्षमतेने त्यांनी संगीत रसिकांच्या अनेक पिढ्यांवर राज्य केले.
- जिष्णू देव वर्मा, महाराष्ट्राचे राज्यपाल
आशा भोसले यांच्या रूपात मंगेशकर कुटुंबातील दुसऱ्या ताऱ्याला आपण गमावले आहे. आयुष्यातील बहुतांश काळ त्यांनी संगीताची सेवा केली. त्यांचे आयुष्य प्रेरणादायी होते. आशा भोसले यांच्यासारख्या ईश्वरीय आवाज असलेल्या गायिका निघून गेल्या. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
भारतीय संगीत सृष्टीतील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या सुरावलींनी अवघ्या जगाला मोहिनी घालणाऱ्या आशा भोसले यांच्या निधनामुळे देशाने एक महान स्वरसम्राज्ञी गमावली आहे. महाराष्ट्रातल्या घराघरांतल्या प्रत्येकाला आपल्या परिवाराचा सदस्य गमावल्याचे दुःख आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील सुवर्णयुगाचा अंत झाला त्यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. त्यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. - सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
आशा... फक्त सुरांची 'चांदणी' नाही... जीवनाला कलाटणी देणारा प्रवासही
संघर्षातून उभं राहायचं, अडचणींवर मात करत स्वतःची ओळख निर्माण करायची तर ही 'आशा' वाचा
संघर्ष, जिद्द आणि अथक मेहनतीची सुरेल कहाणी म्हणजे आशा भोसले यांचे आयुष्य. प्रतिकूल परिस्थितीतून उभं राहत, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आणि प्रत्येक टप्प्यावर नव्याने स्वतःला सिद्ध करत त्यांनी यशाची नवी उंची गाठली. त्यांच्या प्रवासात चढ-उतार होते, अपयशही होते; पण प्रत्येक वेळी त्यांनी अधिक ताकदीने पुनरागमन केलं. म्हणूनच, त्यांचं आयुष्य केवळ एका महान गायिकेची कहाणी नसून, प्रत्येकाला प्रेरणा देणारा जीवनमंत्र आहे.
आज लोअर परळ येथील घरी अंत्यदर्शन
रविवारी दुपारी आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी रुग्णालय परिसरात प्रसार माध्यमांसमोर येऊन त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. प्रतीत समदानी, तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. आनंद भोसले यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत त्यांच्या लोअर परळ येथील राहत्या घरी अंत्यदर्शन घेता येईल.
ही वाट दूर जाते…
संगीतकार आर.डी. बर्मन अर्थात पंचम दा यांच्यासोबतची त्यांची जोडी म्हणजे हिंदी चित्रपटसंगीतातील क्रांतीच होती.
“दम मारो दम”, “पिया तू अब तो आजा”, “चुरा लिया है तुमने जो दिल को” यांसारखी गाणी केवळ लोकप्रियच झाली नाहीत, तर त्यांनी भारतीय संगीताची दिशा बदलली. या काळात आशा भोसले यांचा आवाज अत्यंत बहुरंगी झाला. त्यांनी नंतर पंचमदांशी विवाह केला.
आशा भोसले यांच्याकडून तुम्ही काय शिकू शकता?
१. अडचणींवर मात करण्याची जिद्द
लहान वयात वडिलांचे निधन, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष या सगळ्यांवर मात करून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नये, हे त्यांच्या आयुष्यातून शिकायला मिळते.
२. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे
लता मंगेशकर यांच्यासारख्या महान गायिकेच्या सावलीत असूनही आशा भोसले यांनी स्वतःची स्वतंत्र शैली तयार केली. इतरांशी तुलना न करता स्वतःची खास ओळख निर्माण करणे महत्त्वाचे आहे.
३. सतत शिकत राहण्याची वृत्ती
त्यांनी क्लासिकल, पॉप, गझल, कॅबरे अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन स्वतःला सतत नव्याने घडवले. बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट ठेवणे किती गरजेचे आहे, हे यातून दिसते.
४. धाडसी निर्णय घेण्याची तयारी
वैयक्तिक आयुष्यात त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेतले, मग ते विवाहासारखे असोत किंवा करिअरशी संबंधित. आयुष्यात कधी कधी धाडसाने निर्णय घेणे आवश्यक असते.
५. मेहनत आणि सातत्य यांचे महत्त्व
१२ हजारांहून अधिक गाणी आणि अनेक दशकांचा प्रवास हे त्यांच्या अथक मेहनतीचे फळ आहे. यश मिळवण्यासाठी सातत्य आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नाही.
६. अपयशातून पुन्हा उभे राहणे
पहिल्या वैवाहिक आयुष्यातील अपयशानंतरही त्यांनी आयुष्य थांबू दिले नाही. प्रत्येक अपयश ही नवीन सुरुवात असू शकते, हा मोठा संदेश त्यांच्या आयुष्यातून मिळतो.
७. आवड आणि काम यांचा संगम
संगीतावरील प्रेम आणि काम यांचा सुंदर मिलाफ त्यांनी साधला. जे काम आवडीने केले जाते, त्यात यश मिळण्याची शक्यता अधिक असते. तुम्हाला यश मिळवायचे तर या सात गोष्टी लक्षात ठेवा.