महावितरणमध्ये मनुष्यबळाचा दुष्काळ; २७,६७५ पदे रिक्त, संघटनांकडून पदे भरण्यासाठी शासनाकडे मागणी
By अशोक डोंबाळे | Updated: January 24, 2026 18:11 IST2026-01-24T18:11:07+5:302026-01-24T18:11:26+5:30
दैनंदिन कामकाज, वीजपुरवठा, तक्रार निवारण तसेच थकबाकी वसुलीवरही विपरीत परिणाम होत असल्याचा कर्मचारी संघटनांनी केला आरोप

महावितरणमध्ये मनुष्यबळाचा दुष्काळ; २७,६७५ पदे रिक्त, संघटनांकडून पदे भरण्यासाठी शासनाकडे मागणी
अशोक डोंबाळे
सांगली : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) ही आशिया खंडातील वीज वितरण क्षेत्रातील एक अग्रगण्य सार्वजनिक कंपनी म्हणून ओळखली जाते. मात्र, सध्या या देदीप्यमान कामगिरीमागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून त्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यभरात तब्बल २७ हजार ६७५ पदे रिक्त असणे हे आहे.
महावितरणमध्ये राज्यात एकूण ८१ हजार ४६८ मंजूर पदे असून त्यापैकी केवळ ५४ हजार ७५७ कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित मोठ्या संख्येतील रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाज, वीजपुरवठा, तक्रार निवारण तसेच थकबाकी वसुलीवरही विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे.
राज्यातील तीन कोटी १७ लाखांहून अधिक कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महावितरण पार पाडत आहे. सोलर कृषी पंप बसविण्याचा जागतिक विक्रम, तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार कंपनीच्या नावावर असले तरी, प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे.
तांत्रिक संवर्गात मंजूर ४५ हजार ८०३ पदांपैकी १८ हजार ५०६ पदे रिक्त आहेत. यामध्ये मुख्य तंत्रज्ञ १९९, प्रधान तंत्रज्ञ ९१२, वरिष्ठ तंत्रज्ञ सहा हजार ६०१ आणि तंत्रज्ञ १२,३१३ पदांचा समावेश आहे. तंत्रज्ञ प्रवर्गात एक हजार ५१६ विद्युत सहायकांची भरती केली असली तरी ती अपुरी ठरत आहे. यंत्रचालक प्रवर्गातही स्थिती गंभीर आहे.
पदोन्नती व सरळसेवा भरतीतील १५ हजार ५२६ मंजूर पदांपैकी पाच हजार ६२१ पदे रिक्त आहेत. अभियंता प्रवर्गातही ६३३ पदे रिक्त असून लेखा, आयटी, कामगार, सुरक्षा, कायदेविषयक आदी विभागांमध्ये दोन हजार ९१५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे ग्राहक सेवेवर परिणाम होत असल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत.
रिक्त पदे भरा, कर्मचाऱ्यांचा ताण कमी करा : मोहन शर्मा
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा व सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी तातडीने महावितरण कंपनीमधील २७ हजार ६७५ रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. रिक्त पदांमुळे वीजबिल थकबाकी वाढत असून ग्राहक सेवाही खालावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. महावितरणच्या कार्यक्षमतेसाठी मनुष्यबळ भरतीचा प्रश्न आता तातडीने सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रिक्त पदे भरून कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करावा, अशी मागणीही शर्मा व भोयर यांनी केली आहे.
अशी आहेत रिक्त पदे
- तांत्रिक संवर्ग : १८५०६
- यंत्रचालक संवर्ग : ५६२१
- लेखा विभागासह अन्य कर्मचारी : २९१५
- अभियंता संवर्ग : ६३३