लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभेत गुरुवारी झालेल्या हाणामारीप्रकरणी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खेद व्यक्त करावा आणि पुन्हा असे घडणार नाही याची हमी घ्यावी, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. त्यावर, पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली, तर आव्हाड यांनी जे घडले त्याचे मला वाईट वाटते, झाले ते चुकीचे झाले असे म्हटले.
विधानसभेत हाणामारी करणारे नितीन हिंदुराव देशमुख आणि सर्जेराव बबन टकले या दोन जणांविरुद्ध विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे पाठविण्यात येत असल्याचे अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले. या दोघांना अनुक्रमे आव्हाड आणि पडळकर यांनी विधानभवनात आणले होते, असे अध्यक्ष म्हणाले. आव्हाड यांनी त्यावर आक्षेप घेतला. ते माझ्या पासवर आलेले नव्हते, कालच्या घटनेशी माझा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असा संबंध नव्हता, असे आव्हाड म्हणाले.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला अहवाल सादर विधानभवनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी मला अहवाल सादर केला असून, नितीन हिंदुराव देशमुख यांनी ते सदस्य जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले, तर सर्जेराव बबन टकले याने ते सदस्य गोपीचंद पडळकर यांचा मावसभाऊ असल्याचे सांगितले, असेही नार्वेकर यांनी सांगितले.
अधिवेशन काळात प्रवेशावर निर्बंधअधिवेशन कालावधीत यापुढे सदस्य, सदस्यांचे अधिकृत स्वीय सहायक व शासकीय अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात येईल. इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही. मंत्र्यांकडून विविध बैठका विधानभवनात होतात. मंत्र्यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक घ्यावी. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अशा बैठकांना परवानगी देण्यात येईल, असेही अध्यक्ष म्हणाले.