राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक योजना; औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर भर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 08:03 IST2025-02-04T07:57:45+5:302025-02-04T08:03:43+5:30

पिंक रिक्षा, लाडकी बहीण योजना, फिरते पथक यासह विविध योजनांचा आदिती तटकरे यांच्याकडून यावेळी आढावा घेण्यात आला.

Another scheme for the women of the state Focus on empowering in the industrial sector | राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक योजना; औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर भर 

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक योजना; औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर भर 

Aditi Tatkare: राज्यात लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरलेली असतानाच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून आणखी एक पाऊल उचलण्यात आलं आहे. "महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी  तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. बाजारपेठ असलेल्या तालुकास्तरावर हे भवन उभारण्यात येणार असून, यामध्ये ‘माविम’च्या जास्तीत जास्त महिला बचतगटांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार आहे," असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.

मंत्रालय येथील दालनात रोहा येथे गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करणे, तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज, राज्य बालहक्क संरक्षण आयोग तसेच १०० दिवस कृती आराखड्याबाबत बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा, ‘माविम’च्या कार्यकारी संचालक वर्षा लड्डा, विभागाचे सहसचिव वि. रा. ठाकूर, अवर सचिव सुनिल सरदार, उपसचिव आनंद भोंडवे आदिंसह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, श्रीवर्धन येथे सोलार फिश ड्राईंग प्रोजेक्ट अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत बाजारभिमुख उद्योग विकास घटकांतर्गत शेती, शेतीसंलग्न व बिगर शेती आधारित उद्योगांना व नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याचबरोबर रोहा येथील गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीचे युनिट शहरासह ग्रामीण भागातही सुरू करण्यात यावे. प्रकल्पासाठी पात्र महिलांना योग्य प्रशिक्षण आणि मानधन मिळण्यासाठी पारदर्शक कार्यप्रणाली राबवावी. या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमत्त ‘माविम’ अंतर्गत असलेल्या जास्तीत जास्त बचतगटांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच ‘माविम’चे कार्य ग्रामीण भागातही पोहोचावे यासाठी राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.

राज्यस्तरीय बाल महोत्सवात साहित्य‍िक बालकांना व्यासपीठ उपलब्ध करावे

बालगृह व निरीक्षण गृहातील प्रवेशितांसाठी दरवर्षी राज्यस्तरीय बालमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाअंतर्गत जी बालके कथा, कविता लिहितात, ज्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे अशा साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेल्या बालकांसाठी विशेष व्यासपीठ या बालमहोत्सवात उपलब्ध करून देण्याचे निर्देशही आदिती तटकरे यांनी दिले.

दरम्यान, आदिती तटकरे यांनी विभागातील विविध योजना आणि कामांचा तसेच १०० दिवस कृती आराखड्यासंदर्भात आढावा घेतला. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गरोदर महिला, स्तनदा माता, बालके यांना घरपोच आहार, लाभार्थी बालकांचे ग्रोथ मॉनिटरींग, लाभार्थ्यांना गृहभेटीद्वारे मार्गदर्शन, पोषण विषयक जनजागृतीकरिता समुदाय आधारित कार्यक्रम, ग्राम बाल विकास केंद्र, नागरी बाल विकास केंद्र, अंगणवाडी केंद्रांना शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, भिक्षेकरींच्या कामाचा मोबदला, पिंक रिक्षा, लाडकी बहीण योजना, फिरते पथक यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला.

Web Title: Another scheme for the women of the state Focus on empowering in the industrial sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.