पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 06:02 IST2025-12-23T06:01:39+5:302025-12-23T06:02:07+5:30
१९ वर्षांनंतर वरळीच्या ज्या एनएससीआय डोमच्या मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्याच मंचावर आज, मंगळवारी युतीची घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्धवसेना आणि मनसे यांच्यातील महापालिका निवडणूक जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असून मातोश्री आणि शिवतीर्थावर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. १९ वर्षांनंतर वरळीच्या ज्या एनएससीआय डोमच्या मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्याच मंचावर आज, मंगळवारी युतीची घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. ठाकरे बंधूंच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी सोमवारी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. यावेळी मनसेनेचे बाळा नांदगावकर उपस्थित होते. सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या या चर्चेत युतीचे स्वरूप, जागावाटप, पुढील राजकीय धोरण, निवडणूक रणनीती आणि समन्वयावर चर्चा झाली. उद्धवसेना आणि मनसेचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असून त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब होईल, असेही सूत्रांनी सांगितले.
राज ठाकरेंचा नेत्यांना सल्ला
दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाची सकारात्मक चर्चा झाली असली तरी काही जागांबद्दल एकमत होत नव्हते. राऊत यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी या नेत्यांना जागावाटपाची प्रक्रिया अनावश्यक ताणून धरू नका, ती लांबवू नये, असा सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चर्चा काय झाली?
शिवतीर्थावरील या बैठकीनंतर मनसे नेते नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
उद्धवसेनेचे खा. अनिल देसाई, आ. सुनील राऊत आणि सचिव सुधीर साळवी उपस्थित होते. दादर, विक्रोळी आणि शिवडी या मतदारसंघांतील काही जागांबाबत तसेच युतीच्या घोषणेबाबतच्या नियोजनासंदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा झाली.