संघटन उभे न केल्याची अण्णांच्या मनाला सल
By Admin | Updated: March 16, 2015 02:26 IST2015-03-16T02:26:50+5:302015-03-16T02:26:50+5:30
अनेक वर्षांपासून दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात आंदोलने केली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मी जर संघटन उभे केले असते,

संघटन उभे न केल्याची अण्णांच्या मनाला सल
पुणे : अनेक वर्षांपासून दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात आंदोलने केली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मी जर संघटन उभे केले असते, तर त्याचा फायदा समाजहितासाठी झाला असता, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी व्यक्त केली. भूसंपादन विधेयकाविरोधातील हजारे यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे.
स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचा समारोप महात्मा गांधी भवन येथे रविवारी झाला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेस स्वाभिमानीचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह अण्णा हजारे उपस्थित होते. यावेळी शेतकरी हिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले.
केंद्रातील यापूर्वीचे सरकार किमान पत्राला उत्तरे देत होते. मात्र, केंद्रातील भाजपा सरकारबरोबर भूसंपादन कायद्यात बदल करण्यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जनजागृतीसाठी वर्धा सेवाग्राम ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार आहे, असे हजारे यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून दंडुकशाही आणि षड्यंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्याचा अंदाज घेऊनच आंदोलन सुरू करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाच्याविरोधात हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा राहणार आहे, अशी भूमिका खा. राजू शेट्टी यांनी जाहीर केली. माजी कृषी पणन संचालक डॉ. सुभाष माने, समाजसेविका वर्षा काळे, उद्योजक कैलास वाणी यांनी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारला पाठिंबा दिलेला आहे. मात्र, सरकार चुकेल, त्यावेळी
विरोध करणे हा आमचा नैतिक अधिकार आहे. सत्तेत असलो
आणि नसलो तरी काही फरक पडणार नाही. आम्ही स्वत:हून महायुतीतून बाहेर पडणार नाही, पण
आम्हाला सोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यावा, असेही शेट्टी म्हणाले.