अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:08 IST2025-12-11T15:07:35+5:302025-12-11T15:08:22+5:30
Anna Hazare News: राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ३० जानेवारी २०२६ पासून समाजसेवक अण्णा हजारे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी गावातील यादव बाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून इशारा दिला आहे.

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...
आपल्या उपोषणांच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनावर दबाव आणून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ३० जानेवारी २०२६ पासून समाजसेवक अण्णा हजारे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी गावातील यादव बाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून इशारा दिला आहे.
या पत्रामध्ये अण्णा हजारे लिहितात की, राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा करावा यासाठी २३ मार्च २०१८ रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर सात दिवसांचे उपोषण करण्यात आले आणि त्यानंतर ३० जानेवारी २०१९ रोजी राळेगणसिद्धीच्या यादबबाबा मंदिरात सात दिवसांचे उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर आपण कायदा करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शासनाचे पाच सदस्य आणि सिव्हिल सोसायटीचे पाच सदस्य अशी संयुक्त मसुदा समिती स्थापन करून सदर समित्याच्या ९ बैठका घेऊन लोकायुक्त कायद्याचा मुसदा तयार केला.
दरम्यान, २८ डिसेंबर २०२२ रोजी राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर १५ डिसेंबर २०२३ रोजी राज्याच्या विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. २० डिसेंबर २०२४ रोजीच्या आपल्या पत्रात सदर लोकायुक्त विधेयकास राज्यपाल महोदयांनी मान्यता दिली आहे आणि सदर विधेयक मा. राष्ट्रपती महोदयांच्या मंजूरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले असून त्यासाठी आवश्यक पाठपुरावा शासन करत आहे असे पत्रात नमुद केले आहे.
परंतु आपण पाठवलेल्या पत्राला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी आणि कायदा विधानपरिषदेमध्ये मंजूर होऊन दोन वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा काही माझा वैयक्तिक प्रश्न नाही. देशातील जनतेचा प्रश्न आहे. देशातील भ्रष्टाचाराला रोखण्याचा प्रश्न आहे. एवढा प्रदीर्घ काळ झाल्यानंतरही लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नाही, यावरून हे स्पष्ट होते की, राज्यात लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. त्यामुळे मी विचार केला की, हार्ट अटॅकने मृत्यू येण्यापेक्षा देश आणि समाजाच्या हितासाठी मृत्यु आला तर ते माझे भाग्य समजेन. म्हणून आपणास स्मरण करून देत आहे की, आपल्या सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर महात्मा गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाने मी राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरामध्ये दिनांक ३० जानेवारी २०२६ पासून पुन्हा माझे आमरण उपोषण सुरू करीत आहे, असा इशारा अण्णा हजारे यांनी या पत्राच्या माध्यमातून दिला आहे.