Beed Sarpanch Murder Case: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने देखील केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली होती. आता या मागणीसाठी अंजली दमानिया या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. एक्स पोस्टवरुन अंजली दमानिया यांनी पुरावे घेऊन अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याचे म्हटलं आहे.
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. दुसरीकडे, या प्रकरणात सगळ्या प्रकरणाशी संबधित वाल्मीक कराड याच्यावर अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी सातत्याने या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता पुरावे घेऊन अजित पवार यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे हवे आहेत, तर ते द्यायला मी तयार आहे, त्यांनी मला भेटीसाठी वेळ द्यावा असं अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी त्यांनी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली होती. त्यानुसार सोमवारी संध्याकाळी सात वाजता दमानिया या अजित पवार यांच्या शासकीय निवास्थानी जाऊन भेट घेणार आहेत.
"अजित पवारांशी बोलणं झालं. आत्ता ७ वाजता देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी सगळे पुरावे घेऊन जात आहे," असं अंजली दमानिया यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.