Anjali Damania Met DCM Ajit Pawar: सुमारे २५ ते ३० मिनिटे चर्चा झाली. बीडची घटना माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे, त्याचे मी कुठेही समर्थन करत नाही, असे त्यांचे मत असल्याचे त्यांनी सांगितले. मग त्यावर माझे म्हणणे होते की, मग तुम्ही राजीनामा का घेत नाही. या प्रकरणातील सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले. आज मी त्यांना दाखवले आहे की, कसे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे एकत्र संबंध कसे आहेत. त्यांच्या कंपन्यांत आर्थिक नफा कसा मिळत आहे. तसेच ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये हे सर्व कसे बसत आहे. त्यामुळे तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे सांगितले. गृह मंत्रालयाने आमदार, मंत्र्यांसाठी जे निर्देश दिले आहेत, तेही दाखवले आहेत, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली होती. आता या मागणीसाठी अंजली दमानिया या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीत काय चर्चा झाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय आश्वासन दिले, याबाबत अंजली दमानिया यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.
उद्या दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक
लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीही त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. तसेच त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे सोकॉल्ड समर्थक, ते समर्थक नाहीत तर दहशतवादी आहेत. बीडमध्ये त्यांची दहशत आहे. यासंदर्भातील सगळे फोटो, रिल्स दाखवले. हे सगळे अजित पवार यांनी शांतपणे पाहिले आणि त्यांनी असे सांगितले आहे की, उद्या दुपारी १२ वाजता त्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक आहे. त्या बैठकीत ही सगळी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर ठेवून चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय ते घेणार आहेत. मला खात्री आहे की, जनभावना आहे, आक्रोश आहे, जे कृत्य झाले ते फारच निर्घृण होते. त्यामुळेच आपण हा लढा देत आहोत. हे मी त्यांना सांगितले. संतोष देशमुख यांच्यासोबत झालेले कृत्य यापुढे कधीही होऊ नये, असे महाराष्ट्रात घडू नये. त्यामुळेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे तातडीने आवश्यक आहे, असे मी त्यांना सांगितले, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत समाधानी आहात का?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत समाधानी आहात का? असा प्रश्न अंजली दमानिया यांना विचारण्यात आला. यावर मी समोर ठेवलेली माहिती त्यांनी ज्या पद्धतीने पाहिली, त्यावरून त्यांना अनेक गोष्टींची माहिती नसावी. हे सगळे मिळून काय करत आहेत. सुदर्शन घुले असो, विष्णू चाटे असो, या सगळ्यांची कशी मिलीभगत आहे आणि ते लोकांवर कसा दबाव आणत आहेत. सामान्य माणसाला जगणे कसे कठीण आहे, हे सगळे दाखवले. यापुढे असे राजकारणी महाराष्ट्रात नको. म्हणूनच मी त्यांना विनंती केली की, त्यांचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्या. या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊ दे. सगळे काय ते बाहेर निघेल, असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
...तर धनंजय मुंडे यांचे केवळ मंत्रिपद नाही, तर आमदारकी रद्द होऊ शकते
अजित पवार यांचे म्हणणे होते की, तपासात काही आढळले तर आम्ही पुढे काय करायचे ते पाहू. अजित पवारांची ही भूमिका बदलली आहे का, असा प्रश्न अंजली दमानिया यांना विचारण्यात आला. यावर, मी आज त्यांना जे पेपर दाखवले आहेत, त्यानंतर कोणती शंका राहणे शक्यच नाही. पुराव्यानिशी गोष्टी दाखवल्या आहेत, बॅलेन्सशिट समोर ठेवल्या आहेत. कंपन्यांच्या बॅलेन्सशिटवर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांच्या सह्या आहेत. यावरून आर्थिक नफा त्यांना मिळताना दिसत आहे. या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मीक कराड हे तिघेही आहेत. हे सर्व गंभीर असल्याचे अजित पवारांचे म्हणणे पडले. तसेच विविध कायद्यातील तरतुदी पाहता हा दखलपात्र गुन्हा आहे, हेही समोर ठेवले. निवडणूक आयोगाने ठरवले तर त्यांचे मंत्रिपदच काय तर आमदारकीही रद्द होऊ शकेल. हे होईल असे मला दिसत आहे. आता कारवाई केली नाही, तर स्वतःहून दखल घेऊन कारवाई करण्याबाबत सीजेंना पत्र लिहिले आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.