“गणपती शपथ सांगते की धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्यासाठीच...”; अंजली दमानियांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 14:37 IST2024-12-29T14:33:19+5:302024-12-29T14:37:07+5:30
Anjali Damania Reaction On Dhananjay Munde: गेल्या काही दिवसांपासून बीड प्रकरणावरून अंजली दमानिया सातत्याने मोठे दावे, विधाने करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

“गणपती शपथ सांगते की धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्यासाठीच...”; अंजली दमानियांचे मोठे विधान
Anjali Damania Reaction On Dhananjay Munde: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटक करा, आरोपींना शिक्षा होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशा एकमुखी मागण्या बीडमध्ये काढण्यात आलेल्या विराट मोर्चामध्ये सहभागी सर्वपक्षीय नेते व सामान्य नागरिकांनी केल्या. सत्ताधारी नेत्यांसह विरोधक, सर्वधर्मीय लोकांनी हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला. आरोपींना अटक झाली नाही, तर हे आंदोलनाचे लोण राज्यभर पसरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मोर्चात बीडसह परभणी, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड व अनेक जिल्ह्यांतून लोक, राजकीय नेते सहभागी झाले होते. सर्वांनीच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. मोर्चात ग्रामस्थांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. या प्रकरणी अंजली दमानिया यांनीही मोठे दावे केले होते. मीडियातील वृत्तानुसार, अंजली दमानिया यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती हवी असेल तर त्यांना मी माहिती देणार
अंजली दमानिया यांनी फरार आरोपीच्या संदर्भात जो मृत्यूचा दावा केलाय, त्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे करण्यात आल्या आहेत. याबाबत बोलताना, एसपींनी मी दिलेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली नसेल. म्हणून त्यांचे मला एक पत्र आले आहे. हे पत्र बघून मला आश्चर्य वाटले. पण स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती हवी असेल तर त्यांना मी माहिती देणार, असे दमानिया यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोनच गुन्हेगार आहेत असे नाही. बीडचे अन्य राजकारणी तितकेच गुन्हेगार आहेत. सगळ्यांविरोधात एकदम, एकत्रपणे आंदोलन करणे शक्य नाही, म्हणून याची सुरुवात धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यापासून करण्यात आली. गणपतीची शपथ घेऊन सांगते. गणपती हे माझे आराध्य आहेत, धनंजय मुंडेंचे एकट्याचा राजकारण संपवण्यासाठी हे आंदोलन नाही. तर जिथे असे गुन्हेगारीकरण सुरू आहे. त्यासाठी एक उदाहरण घालून देण्यासाठी हे आंदोलन आहे, असे दमानिया म्हणाल्या. आता अनेक ठिकाणी धनंजय मुंडे तयार होत असल्याने, राजकीय गुन्हेगारीकरण होत असल्याने ते थांबवणे गरजेचे आहे, अशी टीका दमानिया यांनी केली.