“वाल्मीक अण्णा कराड शरण आला अन् पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला”; विरोधकांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:18 IST2024-12-31T15:17:19+5:302024-12-31T15:18:22+5:30
Valmik Karad Surrender: वाल्मीक कराड शरण आल्यानंतर याबाबत शंका उपस्थित करत अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.

“वाल्मीक अण्णा कराड शरण आला अन् पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला”; विरोधकांची टीका
Valmik Karad Surrender: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मीक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण आला आहे. यामुळे पुण्यातील CID मुख्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. CID ची पथके मागील पंधरा दिवसापासून वाल्मीक कराड याचा शोध घेत आहेत. परंतू तो त्यांना सापडू शकला नव्हता. वाल्मीक कराडच्या शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली होती. कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होते, यानंतर त्याचा फोन बंद असल्याचे समोर आले. वाल्मिक कराडने शरणागती पत्करल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे वाल्मीक कराड याने स्पष्ट केले आहे. यावर अंजली दमानिया आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य करताना टीका केली आहे.
वाल्मीक अण्णा कराड शरण आला अन् पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला
शरण येणे किंवा आत्मसमर्पण करणे हा शब्दप्रयोग मीडिया वापरत आहे. या कृतीला आत्मसमर्पण हा शब्दप्रयोग होत असेल तर हा पोलिसांच्या नाकर्तेपणा अधोरेखित करणार आहे. कारण ज्या प्रकरणाने अधिवेशन गाजवले होते, आमदारांनी यावर भाष्य केले, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. तसेच लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. त्यानंतर चौकशी संदर्भात उपायोजना केल्याचे सांगण्यात आले. मात्र शरण येणार आहेत याचे मेसेज सर्वत्र प्रसारित झाले. म्हणजे पोलीस सोडून सर्वांना सगळे काही माहिती होते, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान, वाल्मीक कराड शरण येण्याचा अखेर मुहूर्त मिळाला म्हणायचा. कारण मागील दोन दिवसापासून शरण येणार अशा बातम्या आपण ऐकत होतो. मात्र हा प्लॅनिंग करून शरण येण्याचा कट आहे. हे सर्व ऐकून थोडीशी गंमत वाटली. म्हणजे सर्व पोलीस यंत्रणा ही दोन दिवस त्यांच्या टचमध्ये होती का? त्यांना कुठून समजले की शरण येणार आहेत? मला हे सर्व विचार करून त्रास होतो. गेल्या दोन आठवड्यापासून पुण्यातच होता आणि तो सीआयडी, पोलिसांना मिळाला नाही. दोन दिवस झाले पोलिसांना कळते की, तो सरेंडर होणार आहे. म्हणजे वाल्मीक कराडसारख्या माणसाला राजकीय सरातून पाठबळ मिळत आहे हे त्यातून स्पष्ट होते, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.