Andheri Bypoll : "प्रिय मित्र देवेंद्र... अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका," राज ठाकरेंचं खुलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 13:38 IST2022-10-16T13:38:07+5:302022-10-16T13:38:46+5:30
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत कै. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Andheri Bypoll : "प्रिय मित्र देवेंद्र... अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका," राज ठाकरेंचं खुलं पत्र
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे सेना- काँग्रेस-राष्ट्रवादी महायुतीच्या ऋतुजा लटके व भाजप-शिंदे सेना-रिपाइंचे मुरजी पटेल यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत शुक्रवारी अर्ज भरले. दरम्यान, या पोटनिवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. परंतु आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित आवाहन केलं आहे.
“आमदार कै रमेश लटके ह्यांच्या दुर्देवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक आहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं,” असं राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे.
मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, असंही त्यांनी यात नमूद केलं आहे.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavispic.twitter.com/78nfA21hDP
— Raj Thackeray (@RajThackeray) October 16, 2022
असे आहे राजकीय चित्र
- मतदारसंघात १ लाख ५ हजार मराठी, ५८ हजार उत्तर भारतीय, ३८ हजार मुस्लीम, ३३ हजार गुजराती, १९ हजार दाक्षिणात्य आणि १४ हजार ख्रिश्चन मतदार आहेत.
- महानगरपालिकेचे ८ प्रभाग आहेत. यातील ५ प्रभागात उद्धव ठाकरे गटाचे असून, दोन भाजपचे व एक काँग्रेसचा नगरसेवक आहे.
- संभाजी ब्रिगेडने ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला आहे. तसे पत्र ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी पाठवले.