अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत सुरुवातीपासूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आघाडी घेतली होती. परंतू, नोटानेही मोठ्या प्रमाणावर मते मिळविल्याने काय घडेल हे सांगता येत नव्हते. पण आता परिस्थिती स्पष्ट होऊ लागली असून लटके यांनी झालेल्या एकूण मतमोजणीच्या ७६ टक्के मते मिळविली आहेत. नोटाला अपक्षांपेक्षाही जास्त मते मिळाली आहेत. लटके यांच्यानंतर नोटालाच सर्वाधिक मते मिळाली आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टची सध्या तुफान चर्चा रंगली आहे.
वसंत मोरे (MNS Vasant More) यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये "मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार… अंधेरीच्या मतदानात नोटांचा पाऊस लोकशाही प्रधान देशात अवघड आहे" असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. andherielection हा हॅशटॅग देखील वापरला आहे. भाजपाने उमेदवार मागे घेतला तरी लटकेंविरोधात नोटाला मतदान करण्याचा प्रचार केल्याचा आरोप शिवसेनेने (ठाकरे गटाने) आणि ऋतुजा लटके यांनी केला होता.
भाजपचे पॉ़केट असलेल्या भागामध्ये नोटाला जास्त मते मिळतील अशी अपेक्षा होती. या निवडणुकीत एकूण ३२ टक्के मतदान झाले होते. त्यापैकी जवळपास ७५ टक्के मते ही लटकेंना मिळण्याची शक्यता आहे. तर नोटाला १४ टक्क्यांच्या सरासरीने मते मिळण्याची शक्यता आहे. लटके यांचा विजय निश्चित झाल्याचे समजताच शिवसैनिकांनी देखील शिवसेना भवन आणि मतमोजणी केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या ११ व्या फेरीचा निकाल हाती आला असून ऋतुजा लटके यांना 42343 मते मिळाली आहेत. तर नोटाला 8379 मते मिळाली आहेत. लटके यांना मतमोजणीच्या 76.13 टक्के मते आणि नोटाला 15.06 टक्के मते मिळाली आहेत. अन्य सर्व उमेदवारांचे जवळपास डिपॉझिट जप्त होण्याची स्थिती आहे. एकूण ५५६१९ मतमोजणी पूर्ण झाली आहे.