…आणि धावत्या बसमध्ये भरला महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा जनता दरबार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 05:45 PM2018-06-29T17:45:15+5:302018-06-29T17:48:33+5:30

यवतमाळहून पुसदकडे निघालेल्या बसमध्ये बोरी अरब - शेलोडीच्या मध्ये एक प्रवासी  चढला आणि बसमधील सर्वच प्रवासी क्षणभर अवाक झाले.

... and revenue minister (State) Sanjay Rathod Stuffed Janata Darbar In ST Bus | …आणि धावत्या बसमध्ये भरला महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा जनता दरबार

…आणि धावत्या बसमध्ये भरला महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा जनता दरबार

googlenewsNext

 यवतमाळ – यवतमाळहून पुसदकडे निघालेल्या बसमध्ये बोरी अरब - शेलोडीच्या मध्ये एक प्रवासी  चढला आणि बसमधील सर्वच प्रवासी क्षणभर अवाक झाले. बसमध्ये गर्दी असल्याने उभ्याने प्रवास करणाऱ्या त्या प्रवाशाला वाहकाने बसायला जागा दिली. क्षणात प्रवाशांनी नुकत्याच चढलेल्या त्या प्रवाशाकडे आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी लगबग सुरू केली आणि धावत्या बसमध्येच राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा जनता दरबार सुरू झाला.

 संजय राठोड हे नेहमीप्रमाणे आज दुपारी आपल्या शासकीय वाहनाने यवतमाळहून मतदारसंघात दारव्हा येथे जाण्यासाठी निघाले. बोरी अरबच्या थोडे पुढे गेल्यानंतर त्यांचे शासकीय वाहन (क्र. एमएच29 एम 9731) हे शेलोडीनजीक पंचर झाले. त्यामुळे गाडीचा टायर बदलविण्यासाठी वेळ लागणार असल्याने संजय राठोड यांनी पुढचा प्रवास बसने करण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान यवतमाळहून पुसदकडे जाणारी बस आली.  राठोड यांनी हात दाखवून ही बस थांबविली आणि ते बसमध्ये चढले. त्यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख हरिहर लिंगनवार व स्वीय सहायक यांनीही बसने प्रवास केला.  राठोड यांनी तीन तिकीट घेतल्या.  संजय राठोड यांना बसमध्ये चढलेले पाहून प्रवाशीही कौतुकाने बघत होते. बसमध्ये गर्दी असल्याने अनेक प्रवाशी उभ्याने प्रवास करीत होते. बसमध्ये आमदार, खासदारांसाठी जागा राखीव असतानाही ना. संजय राठोड यांनी इतर प्रवाशांसोबत उभ्यानेच प्रवास सुरू केला. ते बघून वाहकाने आपली जागा त्यांना बसण्यासाठी देऊ केली. पण त्यास नकार देत  राठोड यांनी उभ्यानेच प्रवास करणे पसंत केले. परंतु, नंतर अनेकांनी त्यांना बसण्याचा आग्रह धरल्याने ते वाहकाच्या जागेवर बसले. तेव्हा प्रवाशांनी लागलीच आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडण्यास सुरूवात केली. एका महिलेने आपल्या गावातील रस्त्याची दुर्दशा झाल्याचे सांगून तो बांधून देण्याची मागणी केली. राठोड यांनी त्याची नोंद घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. नंतर बसमध्ये  राठोड यांचा जनता दरबार सुरू झाला. एका व्यक्तीने गावातील शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याकडे लक्ष वेधले. तर एका महिलेने पती-पत्नी एकत्रिकरणात आपली बदली करून देण्याची विनंती केली. एका वृद्ध प्रवाशाने एसटीची तिकीट वाढल्याने आपल्याला प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याची कैफियत मांडली.

केवळ 15 मिनिटांच्या या प्रवासात ना. राठोड यांनी सर्व प्रवाशांच्या समस्या आपुलकीने ऐकून घेत आपल्या जनसंपर्क कार्यालयात लेखी निवेदन देण्याचे आवाहन केले. त्यानुसार सर्वांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली.  राठोड यांनी आज अनपेक्षितपणे केलेल्या या बस प्रवासामुळे अनेक प्रवाशांनी कौतूक केले. तेव्हा यापुढे बसने प्रवास करून लोकांचे गाऱ्हाणे ऐकून घेऊ, असे संजय राठोड म्हणाले. तोपर्यंत बस दारव्हा बसस्थानकात पोहचली. तिथे उतरल्यानंतर बसस्थानकाचा फेरफटका मारून राठोड यांनी आगार प्रमुखांशी चर्चा केली. प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, बसस्थानकावरील स्वच्छता याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तेथून शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते श्रीधर मोहोड यांच्या वाहनाने संजय राठोड ग्रामीण रूग्णालयात गेले. तेथे तालुक्यातील पिंपळखुटा येथे विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडलेले गंगाराम चव्हाण यांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

Web Title: ... and revenue minister (State) Sanjay Rathod Stuffed Janata Darbar In ST Bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.