...अन् तो झाला जिवंत!
By Admin | Updated: May 11, 2014 21:22 IST2014-05-11T20:31:14+5:302014-05-11T21:22:23+5:30
डॉक्टरांनी केले होते मृत घोषित

...अन् तो झाला जिवंत!
अडगाव खुर्द (अकोला ) : कावीळ आजाराने ग्रस्त असलेल्या तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित करताच परिवारातील सदस्यांनी आक्रोश सुरू केला. नातेवाईक, संबंधितांना निरोप देऊन अंत्यविधीची तयारीही करण्यात आली; परंतु मृत घोषित केलेल्या त्या तरुणाने अचानक श्वास घेणे सुरू के ल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आणि दु:खाची जागा आनंदाने घेतली. विश्वास करण्यापलीकडे असलेली ही घटना आकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथे घडली आहे. या तरुणावर अक ोला येथे सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अडगाव खुर्द येथील नंदकिशोर जगन्नाथ महल्ले (३५) या विवाहित तरुणाला तीन-चार महिन्यांपासून कावीळ या आजाराची लागण झाली होती. आजार अंतिम टप्प्यात असताना वडिलांनी त्याला खामगाव येथील बहिणीकडे उपचारासाठी नेले. शनिवार, १० मे रोजी ११.३० वाजता त्याची प्रकृती खूपच बिघडल्याने त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच घरच्यांनी आक्रोश सुरू केला. नंदकिशोरच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असल्याने संपूर्ण अडगाव खुर्द येथे दु:खाची छाया पसरली. सर्वजण त्याच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करीत होते. नंदकिशोरचे वडील त्याचा मृतदेह गाडीत टाकू न गावाकडे निघाले. नातेवाईकांना त्याच्या निधनाचा निरोपही देण्यात आला आणि अंत्ययात्रेची तयारी करण्यात आली. दहनविधीसाठी स्मशानभूमीत लाकडेसुद्धा पाठविण्यात आली. गाडी अडगावात पोहोचल्यावर नंदकिशोरचा मृतदेह बाहेर काढताना घरच्या मंडळीचा आक्रोश पाहवल्या जात नव्हता. त्याच वेळी नंदकिशोरचा श्वास सुरू असल्याचे कु णाच्या तरी लक्षात आले. त्यामुळे काहींनी नीट पाहणी करून त्याला आकोट येथील रुग्णालयात आणले. तेव्हा नंदू जिंवत असून, त्याला उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात नेण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. ही वार्ता कळल्यानंतरही नंदकिशोरच्या परिवारातील मंडळीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले; परंतु यावेळचे अश्रू दु:खाचे नव्हे, तर आनंद आणि आशेचे होते.