महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी चार्टर्ड विमानाने बँकॉकला एन्जॉय करायला जाणाऱ्या माजी मंत्र्याच्या मुलाला वडिलांनी आपली ओळख लावून परत माघारी आणले होते. सुरुवातीला अपहरण झाल्याचे सांगितले गेले परंतू हे माजी मंत्री पूत्र बँकॉकला कशाला जात होते, ते समजल्यावर या घटनेचा बोभाटा झाला होता. अगदी तसाच प्रकार पुण्याच्या ५१ वर्षीय विजय भालेराव यांच्यासोबत झाला आहे. अर्थात त्यांचे विमान काही कोणी माघारी बोलविले नाही, परंतू विमानतळावरच त्यांना अडविल्याने व ताब्यात घेतल्याने एवढे कुटाने करूनही घरच्यांपर्यंत त्यांच्या सिक्रेट बँकॉक ट्रिपचा बोभाटा पोहोचला आहे.
झाले असे की विजय भालेराव हे मुंबई विमानतळावर आले होते. परदेशातून ते येत होते. इमिग्रेशन काऊंटरवर अधिकाऱ्याने त्यांचा पासपोर्ट तपासायला घेतला. काही पाने पलटली, साहेब परदेशवारी करणारे होते. परंतू, काही पाने पलटताच तो अधिकारी थांबला आणि मग संशय आला. मधली पानेच गायब होती. भालेराव यांनी घरच्यांना कळू नये म्हणून बँकॉक ट्रिपचा शिक्का असलेली पानेच फाडली होती. भालेराव यांच्याबाबत या पानांमुळे संशय आल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी हा प्रकार सांगितला.
आता भालेराव यांची बँकॉक ट्रिप कशी सिक्रेट राहिल, घरच्यांना पण याबाबत सर्व माहिती पडले. १४ एप्रिलचा हा प्रकार आहे. इंडोनेशियावरून भालेराव भारतात आले होते. त्यांच्या पासपोर्टच्या पानांतील 17/18 आणि 21-26 नंबरची पाने फाडलेली होती. म्हणजेच त्यांनी एकदा नाही तर जवळपास चारवेळा बँकॉकचा दौरा केला होता. घरच्यांना समजले तर राडा होईल म्हणून त्यांनी ही पाने फाडली होती. सुरुवातीला भालेराव यांनी अधिकाऱ्यांना ही पाने का फाडली हे सांगण्यास नकार दिला होता. अखेर त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले, तेव्हा त्यांनी खरे सांगितले.
आता भालेराव यांच्यावर बीएनएसनुसार कलम 318(4) आणि पासपोर्ट कायदा, 1967 च्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विमानतळावरून त्यांना सहार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. आता एवढे सगळे झाल्यावर घरच्यांना कळालेले असणार, पुढे घरी जाऊन भालेकर यांनाच या गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे.