...अन् मी नारळीकर सरांचा हाेऊन गेलाे ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:34 IST2025-05-21T13:34:21+5:302025-05-21T13:34:56+5:30

ते म्हणत की, चांगले पीएच.डी. विद्यार्थी कधी आकाशातून पडत नाहीत. लहानपणापासूनच मुलांना विज्ञानाचे प्रेम दिले तर अनेक संशाेधक निर्माण हाेतील...

...and I am in love with Narlikar sir! | ...अन् मी नारळीकर सरांचा हाेऊन गेलाे ! 

...अन् मी नारळीकर सरांचा हाेऊन गेलाे ! 

अरविंद गुप्ता, विज्ञानाचे प्रचारक आणि नारळीकर यांचे ‘आयुका’तील स्नेही

ज्येष्ठ खगाेलशास्त्रज्ञ, प्रोफेसर जयंत नारळीकर यांनी त्यांच्या संशोधन संस्थेचा एक भाग म्हणून, बाल विज्ञान केंद्र स्थापन करण्याचे ठरविले होते. ते त्यांचे महत्वाकांक्षी प्रकल्प हाेते. लहान वयातच मुलांमध्ये विज्ञानाची गाेडी निर्माण व्हावी आणि नवनवीन संशाेधन करण्याची प्रेरणा त्यांच्यात निर्माण व्हावी, ही त्यांची त्यामागची प्रेरणा हाेती. ते म्हणत की, चांगले पीएच.डी. विद्यार्थी कधी आकाशातून पडत नाहीत. लहानपणापासूनच मुलांना विज्ञानाचे प्रेम दिले तर अनेक संशाेधक निर्माण हाेतील. 

बाल अन्वेषण विज्ञान केंद्र २००४ मध्ये प्रत्यक्षात आले. यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक आयकॉन दिवंगत मित्र पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीता देशपांडे यांनी या देणगी रूपाने माेठा हातभार लावला. याचे उद्घाटन कलिंगा पुरस्कार विजेते प्राध्यापक यशपाल यांनी केले. या केंद्राच्या माध्यमातून दर दुसऱ्या शनिवारी पुण्यातील १०० हून अधिक शाळांमधील सुमारे १००० विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लोकप्रिय विज्ञान व्याख्यान/प्रदर्शन हाेत असे. त्यांनी सुरू केलेला हा महत्वाकांक्षी उपक्रम आजही सुरू आहे, हे अभिमानाने सांगता येईल असे आहे. याचबराेबर डाॅ. नारळीकर यांनी स्टुडंट समर इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केला हाेता. या अंतर्गत उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये अनेक मुले शास्त्रज्ञांसोबत काही प्रकल्पांवर काम करत असे. त्यामुळे मुलांना “विज्ञान करणे” म्हणजे काय हे समजले. बाल अन्वेषण विज्ञान केंद्र किंवा ‘मुक्तांगण विज्ञान शोधिका’ (MVS) सक्षम करणे आणि त्यांना बुस्ट देणे हीच डाॅ. नारळीकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे वाटते.

या विज्ञान केंद्राला आकार देण्यास मी मदत करू शकतो, असे नारळीकर यांना वाटत हाेते. त्यासाठी मला बाेलावले गेले. मीही तेथे गेलाे. जर मला आवडले नाही तर ६ महिन्यांनंतर मी काम सोडू शकतो, असे मी त्यावेळी नारळीकर यांना सांगितले हाेते. त्यानुसार त्यांनी मला रूजू करून घेतलं. मी सुरुवातीला ६ महिन्यांसाठीच जॉइन केले हाेते, प्रत्यक्षात तब्बल ११ वर्षे तिथे काम केले आणि हा काळ कसा आणि कधी संपला हे कळलेच नाही. यात माझ्यासाेबत डॉ. विदुला म्हैसकर (आता गरवारे बालभवन, पुणे) आणि अशोक रूपनर (आता इंद्राणी बालन सायन्स सेंटर, आयआयएसईआर) या दोन अद्भुत व्यक्ती आल्या. आम्ही २००४ मध्ये arvindguptatoys.com ही लोकप्रिय वेबसाइट सुरू केली. या वेबसाइटवर आम्ही विज्ञान प्रकल्प - छायाचित्रे, व्हिडिओ आणि लोकप्रिय पुस्तके अपलोड करण्यास सुरुवात केली. यात १५ भाषांमध्ये ८,७०० हून अधिक व्हिडिओ बनवले आणि ते यूट्यूबवर अपलोड केले. आमचे ३.७ लाख सबस्क्राइबर्स होते आणि एकेकाळी आम्ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे यूट्यूब चॅनेल होतो. आज जगभरातील १२ कोटी मुलांनी आमचे २-मिनिट टॉयज फ्रॉम ट्रॅश व्हिडिओ पाहिले आहेत.

प्रा. जयंत नारळीकर हे पुनर्जागरण काळातील शास्त्रज्ञ होते. विज्ञानकथा लेखनाचे प्रणेते होते. त्यांनी त्यांच्या मातृभाषेत अर्थात मराठीत विपुल लेखन केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना त्यांच्या ‘टेल ऑफ फोर सिटीज’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.  शालेय आणि महाविद्यालयीन मुलांना व्याख्याने देण्यासाठी नारळीकरांना मोठ्या प्रमाणात आमंत्रित केले जात असे. शेवटी त्यांच्या पत्नी डॉ. मंगला नारळीकर त्यांच्यासोबत होत्या. व्याख्यानानंतर मुलांनी “ऑटोग्राफ”साठी नारळीकरांभाेवती गर्दी केली. पण, नारळीकरांनी कधीही काेणाला ऑटोग्राफ दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी मुलांना पोस्टकार्डवर प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यावर मात्र स्वतःच्या स्वाक्षरीने पोस्टकार्ड पाठवायचे. शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि गणिताची पुस्तके लिहिण्यासाठी नारळीकर हे एनसीईआरटी समितीचे अध्यक्ष  होते.  

बाल विज्ञान केंद्रात मला बोलावले होते...
नारळीकर यांनी १९८८ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ची स्थापना केली. याच IUCAA चा सक्रिय सार्वजनिक संपर्क कार्यक्रम म्हणजे त्यांनी सुरू केलेला त्यांच्या स्वप्नातील बाल अन्वेषण विज्ञान केंद्र किंवा ‘मुक्तांगण विज्ञान शोधिका’ (MVS). याच बाल विज्ञान केंद्रात काम करण्यासाठी नारळीकर यांनी मला २००३ मध्ये आमंत्रित केले होते. सुरुवातीला मी सरकारी संस्थेत काम करण्यास नाखुश होतो; पण नारळीकर यांच्या सांगण्यामुळे मी  केंद्र जॉइन केले आणि  रमून गेलाे.

Web Title: ...and I am in love with Narlikar sir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.