अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंच आणि सदस्य यांच्यात उघडपणे फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. जागेच्या वादावरून महिला सरपंचाने थेट सदस्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे हा वाद पेटल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला सरपंच पद्मा मेसकर आणि ग्रामपंचायत सदस्य राजू उल्ले यांच्यात जागेवरून बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद मिटण्याऐवजी आणखीच पेटला. रागाच्या भरात महिला सरपंचाने यांनी सदस्याच्या कानशिलात लगावली. यानंतर सदस्यानेही प्रतिउत्तर दिले. दोघांमध्ये अक्षरशः झटापट झाली. ही धक्कादायक घटना कार्यालयात कामकाज सुरू असतानाच घडली. कार्यालयातील ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोघांना वेगळे केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ग्रामपंचायत कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणी अशा प्रकारची हाणामारी होणे ही लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत लज्जास्पद बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.