अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 11:25 IST2025-09-07T11:25:05+5:302025-09-07T11:25:56+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांच्या प्रमाणपत्रांवर उपस्थित केलेले प्रश्न मागे घेतले असून आता त्यांनी माफी मागितली.

Amol Mitkari's U-turn! He withdrew the tweet, apologized; What is the real issue? | अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?

अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोनवरील संभाषण व्हायरल झाले होते. यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याबाबत मिटकरी यांनी युपीएससीला एक पत्र लिहिले होते. हे पत्र त्यांनी ट्विट केले होते. दरम्यान, आता त्यांनी हे ट्विट मागे घेत माफी मागितली.

आमदार अमोल मिटकरी यांनी यूपीएससीला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली होती. 'आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची सर्व प्रमाणपत्रे आणि शैक्षणिक पात्रता पूर्णपणे वैध असल्याची खात्री करावी', असं ट्विट त्यांनी केले होते. हे ट्विट त्यांनी शनिवारी मागे घेतले. 

उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर

"सोलापूर घटने संदर्भात केलेले ट्वीट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर माझी वैक्तिक भूमिका होती .आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे', असे ट्विट मिटकरी यांनी केले.

करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांनी सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीर मुरुम उत्खननाविरुद्ध कारवाई केली होती, त्यावेळी हा वाद सुरू झाला. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अजित पवार महिला आयपीएस अधिकाऱ्याला फटकारताना आणि ही कारवाई थांबवावी असे सांगताना दिसत आहेत.  

हे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर प्रशासकीय बाबींमध्ये अयोग्य हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. आता मिटकरी यांनी ट्विट करुन दिलगिरी व्यक्त केली आहे.

Web Title: Amol Mitkari's U-turn! He withdrew the tweet, apologized; What is the real issue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.