छत्रपती संभाजीनगर - मनसेचे २ दिवसीय राज्यस्तरीय पदाधिकारी शिबिर नाशिकच्या इगतपुरी येथे पार पडले. या शिबिराला राज्यभरातील निवडक १२० पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांनी संवाद साधला. यात प्रश्नोत्तर सत्रात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र याच शिबिरात आमंत्रित न केल्याने मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज झाले होते. महाजन यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यानंतर आता पक्षाचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांनी फोन करून प्रकाश महाजन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
नाराज मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, मनधरणी हा शब्द मला मान्य नाही. मला काल अमित ठाकरे यांचा फोन आला. त्यांनी माझी भूमिका ऐकून घेतली. मी प्रसार माध्यमाकडे जायला नको होते अशी नाराजी व्यक्त केली. मी प्रसार माध्यमाकडे गेलो नाही असं त्यांना सांगितले. माध्यमे माझ्याकडे आली त्यात भावनेचा आवेक जास्त होता. मला या गोष्टीचे अत्यंत समाधान आहे. या लहान वयात आपल्या पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्याशी कसं वागावे याची समज अमित ठाकरेंमध्ये आहे. मी तुम्हाला भेटायला येतो असं ते म्हणाले. परंतु मी म्हटलं तुम्ही नेते आहात, मी भेटायला येतो असं सांगितले. तरूण पिढी पक्षातील ज्येष्ठांना सांभाळतेय हे पाहून बरे वाटले. साधारणत: ज्येष्ठ नेत्यांना अडगळीत टाकण्यात येते परंतु माझ्या पक्षात हा नवीन पायंडा दिसून आला असं त्यांनी म्हटलं.
तर बाळा नांदगावकर यांचाही सकाळी फोन आला होता. नांदगावकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असले तरी माझे सहकारी आहेत. त्यांच्याशी जे बोललो ते सांगू शकत नाही. माझ्या मनातील जे काही आहे ते नांदगावकरांना सांगितले. माझी नाराजी नेत्यावर किंवा पक्षावर हा विषय नव्हता. काही त्रुटी असतात त्या सुधारल्या पाहिजेत. प्रामाणिक कार्यकर्त्याला योग्य ते स्थान दिले पाहिजे एवढीच माझी अपेक्षा होती. मी फार मोठा माणूस आहे असं नाही. प्रवक्त्याला दुर्लक्षित समजू नका, प्रवक्ता पक्ष जो काम करतो ते जनतेसमोर नेतो. विरोधकांचे प्रश्न असतात त्याला तोंड देतो त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेची थोडी फार माहिती हवी एवढीच माझी भूमिका होती असं प्रकाश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, माझा अट्टाहास कशातच नाही. देवाने आमच्याकडे लक्ष द्यावे. देवाने सामान्य कार्यकर्त्याचे ऐकून घ्यावे. मी पक्ष हिताचे बोललो. मी प्रवक्ता राहीन किंवा नाही परंतु मी राज ठाकरेंचा माणूस कायम राहीन. मला नेत्यांशी बोलून मानसिक समाधान मिळाले. ज्याप्रकारे नेते बोलले, त्यांनी आपली दखल घेतली हेच माझ्यासाठी मोठे आहे. राज ठाकरेंची वकिली करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सांगितले.