ॲम्ब्युलन्स सायरनने फोडली कोंडी; ‘ऑपरेशन क्लीनअप’ यशस्वी! सायंकाळपर्यंत अनेक मार्ग मोकळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:32 IST2025-09-03T13:30:27+5:302025-09-03T13:32:21+5:30
पोलिस आयुक्तालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक

ॲम्ब्युलन्स सायरनने फोडली कोंडी; ‘ऑपरेशन क्लीनअप’ यशस्वी! सायंकाळपर्यंत अनेक मार्ग मोकळे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: न्यायालयाच्या आदेशानंतर ॲक्शन मोडमध्ये आलेल्या पोलिसांनी सोमवारी रात्रीपासून रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली. मंगळवारी दुपारी कारवाईचा वेग वाढताच महापालिकेसमोरील रस्त्यावर आंदोलक पोलिसांसोबत वाद घालताना दिसले. पोलिसांनी संयमाने काढता पाय घेतला. पोलिस बाहेर पडताच आंदोलकांचा घोषणांचा जोर वाढला. यातच काही मिनिटांनी रुग्णवाहिकेचा सायरन वाजला आणि याच सायरनची कोंडी दुभंगण्यास मदत झाली. रुग्णवाहिकेत कोणी नाही हे समजेपर्यंत पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत अवघ्या काही तासांत येथील दोन्ही वाटा मोकळ्या केल्या. पोलिसांचे ऑपरेशन क्लीनअप यशस्वी झाल्याचे दिसून आले.
सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांनी हालचालींना सुरुवात केली. मुंबई पोलिस आयुक्तालयात उच्च अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक झाली. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर पार्क केलेली वाहने आंदोलकांनी हटवण्यास सुरुवात केली होती. सोमवारी रात्री सीएसएमटीसमोरील वाहने हटवून पोलिसांनी या मार्गांचा ताबा घेतला. मंगळवारी सकाळपासून पालिकेसमोरील जेवणाचे साहित्य घेऊन येणाऱ्या वाहनांना हटविताना मात्र पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, नवनाथ ढवळे, संग्रामसिंह निशाणदर व शेकडो पोलिसांनी मेहनत घेतली.
गुलाल उधळला अन्...
सीएसएमटीसह मेट्रो सिग्नलपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलकांना वाशीसह अन्य ठिकाणी जाण्याची विनंती केली. जागोजागी स्पीकरद्वारे वाहतुकीस अडथळा करू नये, अशा सूचना केल्या. दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, एसआरपीएफ याठिकाणी तैनात होत्या. परिसराला दुपारी छावणीचे स्वरूप आले होते. एका बाजूला पोलिसांचे ऑपरेशन, तर दुसऱ्या बाजूला पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्याची सफाई होत असल्याचे चित्र दिसले. अखेर मंगळवारी सायंकाळी विजयाचा गुलाल उधळत आंदोलक स्वतःहून लगबग करताना दिसले.
समयसूचकता आणि संयम
दुपारी पोलिसांच्या कारवाईचा वेग वाढला. मात्र, काही आंदोलकांनी विरोध करीत आझाद मैदानासमोरील रस्त्यावर घोषणाबाजी सुरू केली. काही आंदोलकांनी वाहने हटवली मात्र काहींचा विरोध कायम होता. अनेक जण ट्रक, टेम्पोवर चढले. दोन वेळा पथक आत जाऊन पुन्हा माघारी फिरले. अचानक पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे पोलिस कर्मचाऱ्यांसह गर्दीत घुसले. पाठीमागून येणाऱ्या रुग्णवाहिकेच्या सायरनने गर्दीला बाजू होण्याचे आवाहन केले. रुग्णवाहिका पाहून काही आंदोलक बाजूला झाले. रुग्णवाहिकेत कोणी नसल्याचा संशय येताच काही आंदोलकांनी रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडला. त्यात, कोणी नसल्याचे समजेपर्यंत पोलिसांनी या मार्गावर कब्जा मिळवला होता. पोलिसांनी अतिशय समयसूचकतेने आणि संयमाने परिस्थिती हाताळली.
पाचव्या दिवशी वाजल्या शिट्ट्या...
गणेशोत्सवाचा बंदोबस्त, नियमित काम आणि त्यात पाच दिवस चाललेल्या मराठा आंदोलनामुळे मुंबई पोलिस दलावर प्रचंड ताण पडला. आंदोलनाच्या पाच दिवसांत मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत कुठेही गालबोट लागू न देता संयमाने सर्व परिस्थिती हाताळली. एकीकडे मराठा आंदोलनाच्या विजयाचा गुलाल उधळला. दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या संयमाचेही कौतुक होत आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या गैरसोयीमुळे दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी सीएसएमटी स्थानक आणि पालिका मुख्यालयासमोरील चौक जवळपास ताब्यात घेतला होता. पोलिसांनी शांततेने त्यांना वाहने हटवण्यास सांगितली. कोंडी फोडण्यासाठी थेट मनोज जरांगे यांना व्हिडीओ कॉल लावून विनंती करण्यात आली. जरांगे यांच्या सूचना थेट आंदोलकापर्यंत पोहोचविण्यासाठी पोलिसांनी व्हिडीओ कॉल, ऑडिओ क्लिप बरोबरच थेट एलईडी स्क्रीनद्वारे त्यांच्या व्हिडीओद्वारे आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी वाहनांचा रिव्हर्स गीअर घेत वाहतूक मोकळी केली. त्यानंतर कोंडी होऊ नये म्हणून सीएसएमकडे येणारी वाहतूक बंद करीत अन्य मार्गाने वळविण्यात आली.
उच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच मंगळवारी या परिसरात तैनात पोलिसांनी प्रथमच शिट्ट्या वाजवून आपले अस्तित्व दाखवून देत गर्दीवर नियंत्रण मिळवले. सीएसएमटी स्थानकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर विसावलेल्या आंदोलकांना पोलिसांनी आझाद मैदानात पाठवले. त्यामुळे मंगळवारी दुपारी सीएसएमटी स्थानकासह बाहेरील आणि पालिका मुख्यालयासमोरील परिसर मोकळा झालेला दिसला.
काही ठिकाणी झाली बाचाबाची
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कोपरीतील आनंदनगर चेक नाक्याजवळ ठाणे आणि मुंबई पोलिसांनी नाकाबंदी करून सकाळी ९ ते दुपारी १२ यादरम्यान अन्नपदार्थांची वाहने वगळता, बाहेर गावाहून आलेल्या मराठा आंदोलकांची वाहने अडविली. त्यामुळे आंदोलकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. न्यायालयाने बंदी केल्यानंतरही ही वाहने मुंबईच्या दिशेने येत होती. पोलिसांनी नाकाबंदी सुरू केल्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूककोंडी झाली हाेती.
आंदोलनामुळे आझाद मैदान परिसरासह सीएसएमटी येथे कोंडी होत असल्याने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना आंदोलकांची वाहने मुंबईबाहेर रोखण्याचे आदेश दिले होते. यामध्ये अन्नपदार्थांच्या वाहनांना सूट दिली होती. मुलुंड तसेच ठाण्याच्या कोपरी पोलिसांनी मुंबई चेक नाक्यावर आंदोलकांची वाहने रोखली. यातील आंदोलकांना विश्वासात घेतल्यानंतर काहींनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र, काहींनी मुंबईत आझाद मैदानावर जाण्याचा हट्ट कायम ठेवल्याने काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली.
मुंबईत वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी आनंदनगर चेक नाका येथे मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलकांची वाहने नाकाबंदीमध्ये तपासणीसाठी रोखली. यादरम्यान नाकाबंदी आणि तपासणीला मुंबई पोलिसांबरोबर कोपरी पोलिसांचे पथक मदतीला होते. अन्नपदार्थांबरोबर इतरही वाहने सोडण्याचा आग्रह काही आंदोलकांकडून केला जात होता. पोलिसांबरोबर काही आंदोलक वाद घालत होते.
- निशिकांत विश्वकार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोपरी पोलिस ठाणे