महायुती सरकारने गुलाबी स्वप्नं दाखवली, पण प्रत्यक्षात मात्र घोषणा पोकळ निघाल्या- अंबादास दानवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:27 IST2024-12-17T17:26:09+5:302024-12-17T17:27:04+5:30
Ambadas Danve, Maharashtra Winter Session 2024: "महिला, मुलींवर अन्याय अत्याचार होत असताना शिवरायांच्या कोणत्या विचारांचे पालन सरकार करतंय?"

महायुती सरकारने गुलाबी स्वप्नं दाखवली, पण प्रत्यक्षात मात्र घोषणा पोकळ निघाल्या- अंबादास दानवे
Ambadas Danve, Maharashtra Winter Session 2024: सत्तेत येण्यासाठी सरकारने मोठी गुलाबी स्वप्ने दाखवली, मात्र प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर सरकारने केलेल्या घोषणा पोकळ निघाल्या, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास, माता-भगिनींचे संरक्षण करण्यात कमी पडले आहे. यूपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्यामुळे बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यास असक्षम ठरले असून राज्यपालांनी त्यांच्या भाषणात गोड-गोड गुलाबी घोषणा केल्या. पण राज्यपाल यांचे भाषण हे केवळ कागदावरचे व सरकारचे कौतुक करणारे आहे असे म्हणत दानवे यांनी राज्यपालांच्या भाषणाबाबत खेद व्यक्त केला.
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सात महिन्यांत उभारलेल्या पुतळ्याचे सात महिनेही संरक्षण सरकारला करता आलं नाही. महायुतीने प्रकाशित केलेल्या जाहिरातींमध्ये शाहू महाराजांच्या फोटोचा विसर सरकारला पडला. सरकारच्या काळात महिला, मुलींवर अन्याय अत्याचार होत असताना शिवरायांच्या कोणत्या विचारांचे पालन सरकार करते, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला.
"१ जुलै २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२४ या महायुती सरकारच्या कार्यकाळात ६७४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.* सर्वात जास्त आत्महत्या या नागपूर, अमरावती विभागात झाल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र केलेली घोषणा हवेतच विरली. आत्महत्यामुक्त घोषणा केली होती मात्र शेतमालाल हमीभाव मिळत नाही, जे त्यांना हा भाव देत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला जात नाही. कांद्याचे आयात निर्यात धोरण, दुधाचे घसरलेले भाव यावरही सरकार बोलत नाही," याकडे लक्ष वेधत दानवे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
"राज्यावर ८ लाख कोटींचे कर्ज असताना राज्याची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत ४१७ वरून १ हजार ट्रिलियन अमेरिकन डॉलर करण्याचे सरकारचे उद्दिष्ट म्हणजे दिवास्वप्नंच आहे. महाराष्ट्र राज्य आज दरडोई उत्पन्नावर १ नंबर वर असला तरी तामिळनाडू, गुजरात राज्याप्रमाणे जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. मागील काळात राज्याला आर्थिक अधोगतीला नेण्याचे पाप या सरकारने केले आहे," असेही दानवे म्हणाले.