"तुझ्या अंगावरचे कपडे सरकारने दिले"; लोणीकरांच्या वक्तव्यावर दानवे म्हणाले, "ही ब्रिटिशांची देशी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:41 IST2025-06-26T12:32:48+5:302025-06-26T12:41:20+5:30

BJP MLA Babanrao Lonikar Controversial Statement:भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन अंबादास दानवे यांनी टीका केली.

Ambadas Danve criticized the Controversial statement made by BJP MLA Babanrao Lonikar | "तुझ्या अंगावरचे कपडे सरकारने दिले"; लोणीकरांच्या वक्तव्यावर दानवे म्हणाले, "ही ब्रिटिशांची देशी..."

"तुझ्या अंगावरचे कपडे सरकारने दिले"; लोणीकरांच्या वक्तव्यावर दानवे म्हणाले, "ही ब्रिटिशांची देशी..."

Ambadas Danve on Babanrao Lonikar Controversial Statement: भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. टीका करणाऱ्यांवर बोलत असताना बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले अशा भाषेत लोणीकर यांनी विरोधकांवर भाष्य केलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यांमुळे नवा वाद पेटला असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लोकशाहीत ही भाषा बरी नसल्याचे म्हणत निवडणुकीत हे सर्व लक्षात ठेवा असं म्हटलं.

परतूर तालुक्यातील वाटूर गावात ‘हर घर सोलर’ योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात बबनराव लोणीकर बोलत होते. यावेळी त्यांनी टीका करणाऱ्या गावातल्या काही जणांवर पातळी सोडून भाष्य केलं. पारावर बसणाऱ्यांना तरुणांना रिकामचोट म्हणत तुमच्या अंगावरील कपडे सरकारमुळे आहेत असं म्हटलं. तुमचे कुटुंबिय सरकारकडून वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असल्याचे लोणीकर म्हणाले. त्यांच्या वक्तव्याने नवा वाद पेटला आहे.

लोणीकरांच्या या वक्तव्यावरुन अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुमची आमदारकी जनतेमुळे आहे असं दानवे यांनी म्हटलं. "ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव. कारण.. तुमचे कपडे,बूट या जनतेमुळे..आमदारकी जनतेमुळे..तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे..तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे..नेतेगिरी जनतेमुळे.. विधानसभेतील स्थान जनतेमुळे...यांचे हे बोल लक्षात ठेवा. निवडणूक येते आहे!", असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.

काय म्हणाले बबनराव लोणीकर?

“पारावर बसणारे काही रिकामचोट तरुण लिहितात की, गावातील ९-१० लोक माझ्या दावणीला बांधलेले आहेत. ते मोदी-फडणवीसांचे अंधभक्त आहेत. हे लोक विचारतात की, मोदींनी काय दिलं? फडणवीसांनी काय दिलं? आणि आमदाराने काय दिलं? गावात जे काही मिळालं ते गेल्या २५ वर्षांत मीच दिलं. ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का?," असं लोणीकर म्हणाले. 
 

Web Title: Ambadas Danve criticized the Controversial statement made by BJP MLA Babanrao Lonikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.