छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:23 IST2025-07-03T17:22:49+5:302025-07-03T17:23:34+5:30
Amaravati Ghost Viral Video News: तरुण आपल्या मित्रांसह केक घेऊन छत्री तलाव परिसरात गेला होता. व्हिडीओमध्ये एक महिला दिसते आणि काही क्षणातच ती गायब होते, असे वर्णनही करण्यात आले आहे.

छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला भुतनीने मारहाण केल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली असून, अनेकांनी तो शेअर केला आहे. यामुळे पोलीस प्रशासनानेही चौकशी सुरु केली असून अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल न करण्याचे आवाहन केले आहे. (Amaravati Ghost Viral Video News)
मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी वाढदिवस साजरा करणारा तरुण आपल्या मित्रांसह केक घेऊन छत्री तलाव परिसरात गेला होता. त्यावेळी अचानक एक महिला त्याच्यावर धावून गेली आणि त्याला मारहाण केली. संबंधित महिलेला ‘भुतनी’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही फोटोमध्ये तर तरुणाच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा असल्याचेही दाखवण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये एक महिला दिसते आणि काही क्षणातच ती गायब होते, असे वर्णनही करण्यात आले आहे.
यावर पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी या प्रकाराबाबत अजूनपर्यंत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, असे सांगितले. राजापेठ व खोलापुरी गेट पोलिस ठाण्यांनी अशा कोणत्याही घटनेची माहिती नाकारली आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही अशी घटना घडल्याचे स्पष्टपणे फेटाळले आहे. त्यांनी सांगितले की, हाच व्हिडीओ काही वर्षांपूर्वीही व्हायरल करण्यात आला होता आणि आता तो पुन्हा एकदा व्हायरल केला जात आहे.
दरम्यान, हा प्रकार सध्या शहरात आणि विशेषतः तरुणांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही व्हिडीओची सत्यता तपासल्याशिवाय तो शेअर करू नये.
( डिस्क्लेमर: लोकमत या व्हिडीओची पुष्टी करत नाही, तसेच अंधश्रद्धा पसरवत नाही. )