गणेशोत्सवात रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी
By Admin | Updated: August 5, 2016 00:36 IST2016-08-05T00:36:16+5:302016-08-05T00:36:16+5:30
गणेशोत्सवाच्या काळात शेवटच्या ५ दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास शासनाने परवानगी दिली आहे

गणेशोत्सवात रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी
पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शेवटच्या ५ दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास शासनाने परवानगी दिली आहे. ही मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी ३० जुलै रोजी याबाबतचे आदेश काढले आहेत. राज्यात १० दिवस गणेशोत्सवाचा आनंद साजरा केला जातो. या आंनदोत्सवात ध्वनिक्षेपकाचा सहभाग हा अविभाज्य भाग झालेला आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेली काही वर्षे ध्वनिक्षेपक वापरण्यावर शासनाने मर्यादा घातली आहे. त्यानुसार गणेशोत्सवाच्या काळात फक्त ३ दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येत होता. माजी आमदार मोहन जोशी यांनी गणेशोत्सवाच्या काळात सलग शेवटचे ५ दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात दोन अधिक दिवस परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गणेशोत्सवामध्ये शेवटचे सलग ५ दिवस ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत.