मालेगाव - गिरणा सहकारी साखर कारखान्यात १७८ कोटींचा शेअर्स घोटाळा झाल्याचा आरोप उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊतांचा थेट निशाणा शिंदेसेनेचे नेते दादा भुसे यांच्यावर होता. मात्र राऊतांच्या आरोपांमुळे व्यथित झालेल्या मंत्री भुसे यांनी मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायादंडाधिकाऱ्यांकडे अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. त्यावर मागील सुनावणीत हजर न राहिल्याने कोर्टाने संजय राऊतांना १२ हजारांचा दंड ठोठावला. मात्र आजच्या सुनावणीत दादा भुसे आणि संजय राऊत एकत्रितपणे कोर्टात हजर झाले आणि भुसे यांनी खटला मागे घेतल्याने संजय राऊतांना दिलासा मिळाला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
न्यायालयात हा खटला संपल्यानंतर दादा भुसे आणि संजय राऊत यांनी एकत्रित माध्यमांशी संवाद साधला. २०२२ च्या एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर पहिल्यांदाच शिंदेसेनेचे नेते आणि संजय राऊत यांना एकत्र पाहिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. यावेळी संजय राऊत म्हणाले की, दादा भुसे आणि आमच्यातील वाद संपला आहे. ज्यांच्यामुळे हा विषय निर्माण झाला तेदेखील आमच्यात राहिले नाही. ते सत्तापक्षात गेलेले आहेत. आता त्यांचे त्यांनी पाहावे. दादा भुसे यांनी विनम्रपणाने हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केले. दादांचे आणि आमचे पूर्वीचे नातेसंबंध इथे कामी आले. माझ्या तब्येतीमुळे फार धावपळ करता येत नाही. तारखांना येता येत नाही. जे घडलं ते उत्तम घडले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मी जे वक्तव्य ज्या आधारे केले होते तो आधार ज्यांनी निर्माण केला होता त्यांनी याबाबत पाहावे. माझ्याकडून चुकीच्या आधारे वक्तव्य केले गेले हे माझ्या कालांतराने लक्षात आले. ज्यांनी हे प्रकरण समोर आणले तेच सत्ताधारी पक्षात गेलेले आहेत. त्यामुळे मी या विषयावर कशाला दादांशी भांडू हा माझा सरळ मुद्दा आहे. ज्यांना भांडायचे असेल ते भांडतील, लढतील. अद्वय हिरे यांनी मला माहिती दिली होती. आता ते सत्ता पक्षात गेलेत, दादा स्वत: मंत्री आहेत. आम्हाला हा विषय संपवायचा आहे. हा कारखाना अद्याप उभा का राहिला नाही अशी माझी भूमिका होती. मी त्याबाबत नंतर माहिती घेतली. आता या विषयावर फार चर्चा करू नये असं सांगत संजय राऊतांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
दरम्यान, गिरणा साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटींचा घोटाळा केला अशा आशयाची बातमी दैनिक सामनात संजय राऊत यांच्या माध्यमातून छापून आली होती. मालेगाव आणि पंचक्रोशीतील जनतेला हे माहिती आहे. एकेकाळी सहकारातून उभा राहिलेला हा गिरणा सहकारी साखर कारखाना विक्रीला निघाला होता. तेव्हा ११ हजार सभासद शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हा कारखाना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे. यासाठी ११०० रुपये प्रति शेअर्स उभे केले होते. सर्वपक्षीय लोकांनी एकत्रित येऊन हा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्यावेळीही काही लोकांनी अफवा पसरवल्या होत्या. त्यामुळे भाग भांडवल उभे राहू शकले नाही. जे काही १.७८ कोटी जमा झाले. ती रक्कम आर्मस्ट्राँग कंपनीला ज्यांनी कारखाना विकत घेतला त्यांना आरटीजीएसच्या माध्यमातून ट्रान्सफर केली. हे सगळे रेकॉर्डवर आहे. मग जो काही आरोप मालेगाववर झाला. त्यातून शेतकऱ्यांचा अवमान झाला म्हणून आम्ही सभासद शेतकरी, पदाधिकाऱ्यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला होता असं मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
संजय राऊतांनी व्यक्त केली दिलगिरी, म्हणून...
संजय राऊत यांनी हे शब्द मागे घ्यावेत अशी भावना आम्ही व्यक्त केली होती. तशी नोटीस दिली होती. परंतु राऊतांनी त्याची दखल न घेतल्याने खटला दाखल केला. नंतरच्या काळात संजय राऊतांनी याची पडताळणी केली. त्यात आपण केलेला आरोप चुकीचा आहे हे त्यांच्या निदर्शनास आले. खोट्या माहितीच्या आधारे राऊतांनी आरोप केले होते. मात्र संजय राऊतांनी मालेगावच्या शेतकरी सभासदांची माफी मागितली आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीचा आणि इतर गोष्टींचा विचार करून हा खटला मागे घेण्यात आला आहे असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं.
Web Summary : Sanjay Raut apologized to Dada Bhuse, settling a defamation case over alleged sugar factory fraud. Bhuse withdrew the case after Raut's apology and acknowledgement of misinformation. They appeared together, signaling reconciliation.
Web Summary : संजय राउत ने दादा भुसे से माफी मांगी, जिससे चीनी मिल में कथित धोखाधड़ी का मानहानि मामला सुलझ गया। राउत की माफी और गलत सूचना की स्वीकृति के बाद भुसे ने मामला वापस ले लिया। वे साथ दिखे, सुलह का संकेत दिया।