सायबर, हवाई अशा सर्वप्रकारच्या हल्ल्यांसाठी सैैन्यदल सक्षम : एस. के. सैैनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 19:07 IST2019-02-19T18:54:42+5:302019-02-19T19:07:35+5:30
पुलवामाच्या घटनेमुळे आर्मी डळमळीत झालेली नाही. आर्मी दहशतवाद्यांशी तोंड देण्यासाठी नेहमीच सज्ज राहते.

सायबर, हवाई अशा सर्वप्रकारच्या हल्ल्यांसाठी सैैन्यदल सक्षम : एस. के. सैैनी
पुणे : आपण नवीन तंत्रज्ञानासह आपला शस्त्रसाठा सज्ज केलेला आहे. तसेच आपण लढण्यासाठी देखील परिपूर्ण आहोत. कारण युध्दात मागे राहून चालत नाही. त्यासाठी अद्ययावत राहिलेच पाहिजे. आपले सैैन्य दल लढण्यासाठी अत्यंत सक्षम आहे. सायबर हल्ला किंवा हवाई हल्ल्यासाठी आपली यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास दक्षिण कमानचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैैनी यांनी व्यक्त केला.
दक्षिण कमानतर्फे दहशतवाद्यांशी लढणाऱ्या जवानांना, अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जवानांना व त्यांच्या कुटुंबीयांना योग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीवर सैैनी म्हणाले, सैैन्यातील जवानांच्या कुटुंबीयांना त्यांना काय सेवा, सुविधा लागत आहेत, त्या दिल्या जात आहेत. पेन्शन योजना, आरोग्य सेवा आदींबाबत सैैन्य दल संपूर्णत: सहकार्य करीत आहे. गेल्या महिन्यात पुण्यातील मेजर नायर शहीद झाले. त्यांची पत्नी शारीरिकदृष्ट्या विशेष आहेत. त्यांनाही योग्य ती मदत देण्यात येत आहे.
...........................
स्थानिक वाहन, तरूणांचा पुलवामामध्ये वापर
पुलवामाच्या घटनेमुळे आर्मी डळमळीत झालेली नाही. आर्मी दहशतवाद्यांशी तोंड देण्यासाठी नेहमीच सज्ज राहते. पुलवामा येथील घटनेत दहशतवाद्यांनी स्थानिक तरूणांचा वापर केला आहे. स्थानिक वाहनांचाही समावेश केला आहे. असा वापर यापूर्वी देखील करण्यात आलेला आहे, अशी माहिती एस. के. सैैनी यांनी दिली.
........................
कॅँटोन्मेंटला योग्य सुविधा द्यायलाच हव्या
कॅँटोन्मेंटमध्ये आज अनेक समस्या आहेत. त्या सोडविणे आवश्यक आहेत. वाढीव एफएसआय, इमारत पुनर्बांधणी, मुलभूत सुविधा आदी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर योग्य निर्णय होणे गरजेचे आहे. शहरातील कॅँटोन्मेंटचा परिसर हा सर्वात हिरवाई असलेला आहे. कारण तो सैैन्यदलाकडे आहे. सध्या शहरांची लोकसंख्या वाढत आहे, विकास वाढत आहे. त्याप्रमाणात कॅँटोन्मेंटमध्ये सेवा मिळत नाहीत. कॅँटोन्मेंटमध्ये सर्व सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तरच त्यांचाही विकास होईल, असे एस. के. सैैनी म्हणाले.