'लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा शिवसेना स्वबळावर लढणार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:17 IST2018-08-28T17:16:58+5:302018-08-28T17:17:32+5:30
शिवसेना लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा स्वबळावर लढवणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

'लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा शिवसेना स्वबळावर लढणार'
मुंबई- 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. अनेकांनी त्या त्या मतदारसंघात पुढच्या वर्षी होणा-या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या काल झालेल्या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही आज शिवसेना भवनात एक बैठक घेतली आहे. त्या बैठकीत शिवसेना लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा स्वबळावर लढवणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गणेशोत्वापूर्वी शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार निश्चित करण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेनं आतापासूनच चाचपणीला सुरुवात केली आहे.
मुंबईत लोकसभेचे 6 सहा मतदारसंघ आहेत. त्यातील काही मतदारसंघ हे भाजपाकडे आहेत. त्यामुळे भाजपाकडून ते मतदारसंघ कशा प्रकारे हिसकावता येतील यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहणार आहे. तसेच शिवसेनेच्या विद्यमान 18 खासदारांना पुन्हा संधी मिळणार आहे. भाजपा नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना रणनीती आखणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मुंबईतील खासदार, आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक संपली, त्यानंतर शिवसेना लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार आणि नगरसेवकही या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना दिग्गज नेत्यांना भाजपाच्या विरोधात रिंगणात उतरवणार आहे.