अकोला-नांदेड राज्यमार्ग झाला राष्ट्रीय महामार्ग
By Admin | Updated: June 3, 2014 01:51 IST2014-06-02T22:03:22+5:302014-06-03T01:51:13+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू

अकोला-नांदेड राज्यमार्ग झाला राष्ट्रीय महामार्ग
अकोला : राज्य महामार्ग असलेल्या अकोला, वाशिम, नांदेड मार्गे देगलूर या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार हा राज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, तुळजापूर-लातूर, अहमदपूर, नांदेड, यवतमाळ मार्गे वर्धा या राज्य महामार्गाला ३६१ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड मार्गे देगलूर या राज्य महामार्गालादेखील १६१ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वी राज्यमार्ग असलेला हा महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्याने आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड मार्गे देगलूर हा राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या औरंगाबाद मंडळामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकोला मंडळाला नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे.