कल्याणमध्ये मराठी कुटुंबीयांना मारहाण, दमदाटी करणाऱ्या अखिलेश शुक्ला याला अखेर अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:08 IST2024-12-20T18:08:28+5:302024-12-20T18:08:54+5:30
Kalyan Crime News: घराबाहेर धूप पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून शेजारील मराठी कुटुंबीयांना मारहाण करून दमदाटी करणाऱ्या सरकारी कर्मचारी असलेल्या अखिलेश शुक्ला नावाच्या अमराठी व्यक्तीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. हे

कल्याणमध्ये मराठी कुटुंबीयांना मारहाण, दमदाटी करणाऱ्या अखिलेश शुक्ला याला अखेर अटक
घराबाहेर धूप पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून शेजारील मराठी कुटुंबीयांना मारहाण करून दमदाटी करणाऱ्या अखिलेश शुक्ला नावाच्या अमराठी व्यक्तीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच हा प्रश्न विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित झाला होता. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी निवेदन देत आरोपीवर कारवाईचं आश्वासन दिलं होतं. सोबतच अखिलेश मिश्रा याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आल्याचीही माहिती दिली होती.
एमटीडीसीमध्ये कार्यरत असलेल्या अखिलेश शुक्ला याच्या कुटुंबीयांचा धूप पेटवण्यावरून शेजाऱ्यांशी वाद झाला होता. त्यानंतर अखिलेश शुक्ला याने १० ते १२ जणांच्या गुंडांचं टोळकं बोलावून सोसायटीमधील तीन जणांना मारणाह केली होती. या मारहाणीत अभिजित देशमुख, धीरज देशमुख आणि विजय कविलकट्टे हे जखमी झाले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तसेच दोन्हीकडून दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारींच्या आधारावर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, या प्रकरणी वाद वाढल्यानंतर गायब असलेल्या अखिलेश शुक्ला याने सोशल मीडियावरून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. आपली पाचवी पिढी कल्याणमध्ये राहत असून, आपण स्वत:ला मराठी भाषिक समजतो, असा दावा केला होता. तसेच दोन शेजाऱ्यांमधील वादाला भाषिक रंग देण्यात आल्याचा दावाही त्याने केला. एवढंच नाही तर देशमुख कुटुंबीयांनी शिविगाळ केल्याचा तसेच आपल्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोपही अखिलेश शुक्ला याने केला होता. मात्र आता पोलिसांना अखिलेश शुक्ला याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.