बाजार समितीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांसोबत झळकला अजित पवारांचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 22:26 IST2023-04-20T22:25:29+5:302023-04-20T22:26:07+5:30
धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील गटबाजी पाहायला मिळत आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांसोबत झळकला अजित पवारांचा फोटो
जळगाव - गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. माध्यमांमध्ये सातत्याने अजित पवारांबद्दल बातम्या येत असताना बुधवारी अजित पवारांनी याचा खुलासा करत जीवात जीव असेपर्यंत पक्षात राहणार, राजकीय चर्चा तथ्यहिन आहेत असं म्हटलं. त्यानंतर अजित पवारांच्या बातम्यांना तुर्तास पूर्णविराम मिळाला. परंतु जळगावात बाजार समितीच्या निमित्ताने लागलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
जळगावातील धरणगाव बाजार समिती निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीचा एक गट मैदानात उतरला आहे. त्यामुळे प्रचार पत्रकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी शिवसेना-भाजपासोबत युती करत बाजार समितीत उमेदवार उभे केले आहेत. याआधीही दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पवारांनी शिवसेना-भाजपाला साथ दिली होती.
धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील गटबाजी पाहायला मिळत आहे. अर्धी राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केले. शेतकरी टिकेल तर शेत पिकेल असं म्हणत शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी सहकार पॅनेल या निवडणुकीत उभे करण्यात आले आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांचा फोटो एकत्रित पाहायला मिळत आहे.
राज्यात अजितदादांचीच चर्चा
विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार या वृत्ताने तीन दिवस राजकीय वर्तुळ ढवळून निघाले होते. त्यावर स्वतः दादांनीच जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असे स्पष्ट केल्याने तूर्त पडदा पडला. आपल्याबाबतच्या बातम्या पेरल्या गेल्या अशी अजितदादांची तक्रार आहे. प्रसारमाध्यमांनी आता हे प्रकरण संपवावे असे आर्जवही त्यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे झालेल्या शपथविधीनंतर अजितदादांबाबत शंकेचे वातावरण कायमच राहिले आहे. त्यामुळे त्याबाबत छोटेसेही काही घडले की लगेच त्याच्या मोठ्या बातम्या होतात. त्यातच अचानक नॉट रिचेबल होत अजितदादाच मग गॉसिपिंगला वाव देतात. काही दिवस सुरू असलेल्या चर्चेच्या मुळाशी अजित पवार यांच्यावर रोख असलेले संजय राऊत यांचे मुखपत्रातील ठोक वाक्य कारणीभूत ठरले. भाजपसोबत जाण्यासाठी आपल्या कुटुंबातील काही जणांवर दबाव असल्याचे उद्धव ठाकरेंबरोबरच्या भेटीत शरद पवार यांनीच सांगितल्याचा दावा त्यावेळी तिथे हजर असलेले राऊत यांनी केला अन् अजितदादा हे भाजपचे बोट धरणार असल्याच्या बातमीला बळ मिळाले.