अजित पवारांचे आजारपण राजकीय? तटकरे खुलासा करणार; शाह भेटीवरही बोलण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:21 PM2023-11-17T12:21:37+5:302023-11-17T12:22:03+5:30
अजित पवार यांना मराठा आरक्षणाचे आंदोलन तापलेले असतानाच डेंग्यू झाला होता. यानंतर ते सक्रीय दिसले नव्हते. दिवाळीत ते कौटुंबीक कार्यक्रमांत दिसले होते. वानखेडेवरही मॅच पाहण्यासाठी गेलेले.
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अजित पवारांनी आपल्या आमदार, मंत्र्यांची बैठक बोलविली असून राष्ट्रवादीचे खासदार दुपारी चार वाजता सुनिल तटकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये तटकरे संजय राऊतांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याबरोबरच अमित शाहा भेट, शरद पवार भेटीगाठी आदी विषयांवरही बोलण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांना मराठा आरक्षणाचे आंदोलन तापलेले असतानाच डेंग्यू झाला होता. यानंतर ते सक्रीय दिसले नव्हते. उपचार आणि विश्रांती घेत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले होते. यावेळी त्यांच्यावर राजकीय आजारपण असल्याची टीका विरोधकांकडून झाली होती. दिवाळीपूर्वीही विश्रांती घेणार असल्याचे ट्विट पक्षाने केले होते. परंतू, अजित पवार कौटुंबीक कार्यक्रमांना, दिल्ली दौऱ्यावर आणि काटेवाडीत मोकळेपणाने फिरताना दिसत होते.
या काळात अजित पवारांनी शरद पवारांसोबत तीन ते चारवेळा कार्यक्रमांना हजेरी लावली होती. भाऊबीज आटोपून अजित पवार हे थेट बारामतीहून वानखेडेवर मॅच पाहण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, राजकारण किंवा सरकारी दौऱ्यांना ते गेले नव्हते. यामुळे अजित पवारांबाबत पुन्हा एकदा अफवा उडायला लागल्या होत्या.
या साऱ्या गोष्टींवर सुनिल तटकरे आज सायंकाळी पत्रकार परिषदेत खुलासे करण्याची शक्यता आहे. याचबरोबर अजित पवार निधीवाटपावरून नाराज आहेत की नाहीत ते देखील समजण्याची शक्यता आहे. राऊतांनी अजित पवार दिल्लीत जाऊन रडल्याचा दावा केला होता. त्यांची गळचेपी होत असल्याचेही म्हटले होते. यावरही प्रत्यूत्तर मिळण्याची शक्यता आहे.