अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
By Admin | Updated: March 16, 2015 00:13 IST2015-03-15T22:51:36+5:302015-03-16T00:13:13+5:30
तासगावात बैठक : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश

अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
तासगाव : तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्था चांगल्या पध्दतीने चालविल्या गेल्याच पाहिजेत. अन्यथा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यास मी मागे-पुढे पाहणार नाही, असे स्पष्ट करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. तासगाव, कवठेमहांकाळच्या पोटनिवडणुकीत आर. आर. आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्या विजयासाठी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले. शनिवारी अजित पवार यांनी तासगावात बैठक घेऊन कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावण्याबरोबरच प्रोत्साहितही केले. शनिवारी अजित पवार यांच्यासह आमदार जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी तासगावात येऊन कार्यकर्त्यांची स्वतंत्रपणे मते अजमावून घेतली. दिवसभर ही प्रक्रिया सुरू होती. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील आबा समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी आपली सडेतोड मते व्यक्त केली.सुमारे तासभर सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या भाषणात बारकावा होता. आबांचे व्यक्तिमत्त्व उलगडून सांगत असताना त्यांनी लगावलेले चौकार, षटकार कार्यकर्त्यांना अंतर्मुख करायला लावणारेच आहेत. केवळ तासगाव, सांगली नाही, तर राज्यात सर्वत्र, विशेषत: विधिमंडळात आबांची उणीव पावलोपावली जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, अन्य राज्यांचे मुख्यमंत्री यांनी शोकसंदेश पाठवले. हे सर्वसाधारणपणे घडत नाही, याची आठवण त्यांनी करून दिली.राज्यातल्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांत सर्वात लोकप्रिय आबाच होते, हे सांगताना त्यांच्या मताधिक्याबाबत पवारांनी उपस्थित केलेला प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. खुद्द आबांनीही यापूर्वी अनेकदा ही बाब बोलून दाखविली होती. नेमके तेच पवार बोलल्याने सभागृहात शांतता पसरली होती. या त्यांच्या विधानाने त्यांना काय म्हणायचे होते, ते कार्यकर्त्यांना चांगलेच कळले.दुसरीकडे तालुक्यातल्या स्थानिक स्वराज संस्था, सहकारी संस्था उत्तम चालल्या पाहिजेत अन्यथा राजीनामे घेणार असल्याचे त्यांचे विधान अधिक चर्चिले जात आहे. आबा गटात आबांचाच शब्द अंतिम असायचा. झिडकारणे हा त्यांचा पिंडच नसल्याने त्यांनी समजावून घेणे पसंत केले. याच पार्श्वभूमीवर अजित पवार स्पष्ट बोलले. ‘समजावून घेणे जमत नाही, पहिल्यांदा राजीनामा, मग बाकीचे’, असे सांगून त्यांनी संस्था कायम असते, याची जाणीवही करुन दिली.उमेदवारी अर्ज भरतानाची घ्यायची दक्षता ते निवडणूक प्रक्रियेतील कार्यकर्त्यांची भूमिका, जबाबदाऱ्या इथंपर्यंत त्यांनी उल्लेख केला. तो करीत असताना आबांनी उभे केलेले काम, त्यांचा दृष्टिकोन व उर्वरित कामांसाठी राष्ट्रवादीचे प्रमुख आमदार भविष्यात मतदारसंघासाठी देणार असलेला वेळ, या सर्व विषयांना स्पर्श करून अखेर संघटना मजबूत ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)
...तरीही आबांचे मताधिक्य कमी का?
आर. आर. पाटील यांना ‘राज्याचे लाडके नेते’ असे संबोधले जात होते. अशी लोकप्रिय उपाधी सध्या कुणाही राजकारण्याला नाही. राज्यातल्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांतही सर्वात लोकप्रिय आबाच होते, हे सांगताना आबा सर्वांचेच लाडके, लोकप्रिय नेते होते, त्यांचा शब्द अंतिम मानला जात होता, मात्र निवडणुकीमध्ये त्यांचे मताधिक्क्य कमी का? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला. खुद्द आबांनीही यापूर्वी अनेकदा ही बाब बोलून दाखविली होती. नेमके तेच पवार बोलल्याने सभागृहात शांतता पसरली.