भाजपच्या विजयाने अजित पवार भलतेच खूश; इंडिया आघाडीला लगावला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 05:23 PM2023-12-03T17:23:38+5:302023-12-03T17:57:02+5:30

अजित पवार यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे.

Ajit Pawar very happy with BJPs victory in 3 assembly election results | भाजपच्या विजयाने अजित पवार भलतेच खूश; इंडिया आघाडीला लगावला खोचक टोला

भाजपच्या विजयाने अजित पवार भलतेच खूश; इंडिया आघाडीला लगावला खोचक टोला

रायगड : विधानसभा निवडणूक झालेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने विरोधकांना अस्मान दाखवलं. या निकालाचे पडसाद देशभर उमटत असून भाजपच्या विजयामुळे एनडीएला पाठिंबा जाहीर केलेले राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच खूश झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच विरोधी पक्षांच्या इंडिया या आघाडीला खोचक टोला लगावला आहे.

"इंडिया-इंडिया करणारे जे आहेत, ते आता ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाला, अशा पद्धतीचं बोलायला सुरुवात करतील. पण त्यात काहीही तथ्य नाही. लोकांनी पंतप्रधान मोदींकडे बघून भाजपला पाठिंबा दिला आहे. या विजयाबद्दल मी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह सगळ्यांचं अभिनंदन करतो," अशी प्रतिक्रिया श्रीवर्धन येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी दिली आहे.

'मला अमितभाईंनी तेव्हाच सांगितलं होतं...' 

भाजपच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना अजित पवार म्हणाले होते की, "विधानसभा निवडणुकांचा आज लागलेला निकाल अनपेक्षित नाही. मध्यंतरी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलो होता. तेव्हा अमितभाईंनी सांगितलं होतं की, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा निकाल चांगला लागेल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या देशाची प्रगती होत आहे. जागतिक पातळीवरील भारताचा नावलौकिक वाढला आहे. जगभरातील विविध ठिकाणी भारताचे लोक अडकल्यानंतर कौशल्य वापरून पंतप्रधान मोदी त्या लोकांना भारतात आणतात. वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये देशाचा वेगाने विकास होत आहे. गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या विकासाला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या जनतेने कौल दिला आहे. तेलंगणात पण रेवंत रेड्डी म्हणून जी व्यक्ती आहे, ते आधी अभाविपचा कार्यकर्ता होते. त्यांना काँग्रेसने आपल्याकडे खेचल्यामुळे तिथं वेगळा निकाल लागला. ते जर काँग्रेसमध्ये गेले नसते तर तेलंगणातही वेगळं चित्र दिसलं."

दरम्यान, तेलंगणात काँग्रेसने केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव केला आहे. तेलंगणाच्या निकालाबद्दल बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, "तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातही जाहिरात देत होते. महाराष्ट्रातील अनेक माजी आमदार त्यांनी पक्षात घेतले. तसंच शेती, पाण्याविषयी आम्ही  अनेक योजना राबवत असल्याच्या त्यांच्या जाहिराती पेपरमध्ये वाचायला मिळत होत्या. मात्र लोकांनी त्यांना नाकारलं. जनता जनार्दन सर्वस्व असते. आपण कितीही प्रचार केला, काहीही सांगितलं तरी जनता त्यांच्या मनात असतं तेच करते," असं अजित पवार म्हणाले.

Web Title: Ajit Pawar very happy with BJPs victory in 3 assembly election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.