"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 11:13 IST2025-11-22T11:10:59+5:302025-11-22T11:13:51+5:30
माळेगावकरांना सूचक इशारा देत अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या प्रचाराचा नारळ फोडताना, मतदारांना थेट इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही माझ्या बाजूच्या उमेदवारांना निवडून नाही दिले, तर मी निधीत काट मारणार, असे सूचक विधान करत माळेगावकरांना आपल्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. १८ उमेदवार निवडून द्या, मी बोललेले सगळं करणार असंही आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले.
शुक्रवारी माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली. "एका झटक्यात सगळी काम होत नाहीत. त्यासाठी व्हिजन लागतं. मतभेद असले तरी बाजूला ठेवावे लागतात. अर्थ मंत्रालय माझ्याकडे आहे परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं तसं वाढपी तुमच्या समोर उभा आहे," असं अजित पवार म्हणाले.
ग्रामपंचायतीचे खुळ डोक्यातून काढा
माळेगाव नगरपंचायतीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याची क्षमता केवळ आपल्याकडेच आहे, हे पवारांनी स्पष्ट केले. "माळेगावकरांनो, तुमचं बजेट आहे फक्त पाच-सहा कोटी रुपयांचं. त्यात तुम्ही कितीही वर्ष घास घास घासली तरी विकास होऊ शकत नाही. बारामतीचा विकास जसा हजारो कोटी आणून झाला, तीच गोष्ट आपल्याला माळेगावला करायची आहे." माळेगाव नगरपंचायत माझ्या विचारांची नसेल, तर माझे फारसे अडणार नाही, पण माझ्या विचारांचे लोक असतील तर निधी कसा वापरायचा हे मला सांगता येईल, असे त्यांनी नमूद केले.
"तुम्ही आम्ही ज्या अठरा लोकांचे पॅनल उभं केलं आहे त्यांना निवडून द्या. मी काय साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला विकासाची काम करून देतो. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि चौदाशे कोटी रुपयांचा निधी माझ्याकडे आहे. कोणी संपत नसतं त्यामुळे संकुचित विचार ठेवू नका, मन मोठं करा. तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले तर तुम्ही सांगितलेलं सगळं द्यायला मी तयार आहे. पण तुम्ही तिथे काठ मारली तर मी पण काठ मारणार. तुमच्या हातामध्ये मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचा आहे. मग बघा काय ते. सर्वसामान्य बारामतीकर माझ्याबरोबर आहे," असेही अजित पवार म्हणाले.