अजित पवार-शरद पवार गुप्त भेट, नाना पटोले म्हणाले, दादा परत आले तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 21:20 IST2023-08-12T21:17:36+5:302023-08-12T21:20:58+5:30
Ajit Pawar : दीड महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिंदे-फडवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या अजित पवार यांनी आज शरद पवार यांची गुपचूप भेट घेटल्याने चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार-शरद पवार गुप्त भेट, नाना पटोले म्हणाले, दादा परत आले तर...
गेल्या चार वर्षांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये दररोज नवनवे प्रयोग सादर होत आहेत. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिंदे-फडवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या अजित पवार यांनी आज शरद पवार यांची गुपचूप भेट घेटल्याने चर्चांना उधाण आले आहे. या गुप्त भेटीवरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता नाना पटोले यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीबाबत प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, अजित पवार परत आले तर त्यांचं स्वागतच होईल. नाना पटोले यांच्या प्रतिक्रियेमुळे या भेटीमध्ये काय घडलं असावं याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही बैठक झाली. शरद पवार आज पुण्यात होते. तसेच चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारही पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट झाल्याची बातमी समोर आली आहे.