“देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचे कारण नाही”; अजितदादांनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 20:05 IST2023-05-08T20:04:01+5:302023-05-08T20:05:18+5:30
Ajit Pawar News: सरकारला धोका नाही, असे सांगावे लागते. मात्र परिस्थिती वेगळी आहे, असे सूचक विधान अजित पवारांनी केले.

“देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचे कारण नाही”; अजितदादांनी सुनावले
Ajit Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानांवरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. मी पुन्हा येणार म्हटले की येतोच, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचत टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना सुनावले आहे.
इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावर अजित पवार यांनी उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचे कारण नाही
त्यांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचे कारण नाही. जर ३६ जिल्ह्यांपैकी आम्ही साडेतीन जिल्ह्यातील असू तर मग त्यांच्यासमोर कुणी विरोधकच दिसत नाही. कारण शिवसेनेची त्यांनी ती अवस्था केली. आम्ही तर साडेतीन जिल्ह्यातीलच आहोत. काँग्रेसबद्दलपण ते तेच म्हणत असतात. काँग्रेस संपवली पाहिजे अशीच भाजपची वक्तव्ये असतात, असा पलटवार अजित पवार यांनी केला. दुसरीकडे निवडणुकांनंतरही आमच्या सरकारला धोका नाही, असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. यावर बोलताना, सरकारला धोका नाही, असे सांगावे लागते. मात्र परिस्थिती वेगळी आहे. अधिकाऱ्यांकडून मिळत असलेली माहिती निराळी आहे, असे सूचक विधान अजित पवारांनी केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. जे कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे, असे म्हणत असतील. त्यांचा भारतीय जनता पक्षाने फौजदाराचा हवालदार केला आहे. आता त्यांनी आमची मापे काढावीत का, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.