अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का! नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:42 IST2025-10-28T18:41:44+5:302025-10-28T18:42:40+5:30
Maharashtra Politics: ४ माजी नगराध्यक्ष, २३ माजी नगरसेवक, ८ नगरसेवक, २ माजी जिल्हा परिषद सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांचा समावेश

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का! नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Maharashtra Politics: महाराष्ट्रात सध्या निवडणूकपूर्व तयारीचे वारे वाहत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील घटक पक्षाचे नेतेमंडळी आणि पदाधिकारी यांच्या पक्षांतराला वेग आला आहे. पक्ष कार्यालयात महिलेने लावणी केल्यावरून ट्रोल झालेल्या अजित पवारांच्या पक्षाला आता मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातील नेते आणि पदाधिकारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थिती नांदेडमध्ये आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास सुमठाणकर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात ४ माजी नगराध्यक्ष, २३ माजी नगरसेवक, ८ नगरसेवक, २ माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सभापती, माजी पंचायत समिती सदस्य यांचा समावेश आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
"नांदेड हा काँग्रेस विचाराचा जिल्हा असून काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. तो नेत्यांचा पक्ष नाही. आजही नांदेड जिल्हा काँग्रेस विचाराचाच आहे व उद्याही काँग्रेस विचाराचाच राहिल. काँग्रेस पक्षात इतर पक्षातून येणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. काल गडचिरोलीत आज नांदेड जिल्ह्यात तर उद्या जालना जिल्ह्यात पक्ष प्रवेश होत आहे. हा राहुल गांधी यांच्या संघर्षाचा परिणाम असून काँग्रेस विचारावर विश्वास ठेवून हे पक्ष प्रवेश होत आहेत याने पक्षाला बळ मिळत असून महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव प्राप्त होतील" असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडासाफ करा, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधान केले होते. त्या विधानावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांचेच दात त्यांच्या घशात जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.