Ajit Pawar Eknath Shinde Video: 'गेल्यावेळीही आम्ही तिघे होतो. खुर्च्यांची थोडी अदलाबदल झालीये', असं उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंनी म्हणताच अजित पवार हसायला लागले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरता आले नाही. त्यानंतर अजित पवारांनी फडणवीसांकडे बघून डोळा मारला आणि उत्तर दिलं. त्यानंतर पत्रकार परिषदेत हास्याचे कारंजे उडाले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.
एकनाथ शिंदे काय बोलून गेले?
अजित पवारांनी अर्थसंकल्पातील घोषणा आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला लागले. शिंदे सुरूवातीलाच म्हणाले की, "गेल्या वेळी पण आम्ही तिघे होतो. खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली आहे.'
अजित पवारांनी लगेच दिलं उत्तर
उपमुख्यमंत्री शिंदेंनी असं म्हणताच अजित पवार हसायला लागले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे बघितले. डोळा मारल अन् म्हणाले की, "मनातनं काही जात नाही ते." हे ऐकताच सगळेच खळखळून हसले.
त्यानंतर शिंदे म्हणाले, "अदलाबदल झाली असली, तरी टीम तीच आहे." याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अदला बदल झालीये, पण बदला बदल नाही झालाय."
फडणवीस, शिंदे आणि पवार; बघा व्हिडीओ
यापूर्वीही घडलं होतं असंच
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतही शिंदेंनी असेच विधान केले होते.
"सरकारची नवी टर्म असली, तरी आमची टीम जुनीच आहे. (मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बोट करून) फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादांचं बरं आहे. नो टेन्शन", असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते.
त्यावर शिंदेंना उद्देशून अजित पवार बोलले होते की, "तुम्हाला फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू?" अजित पवारांचे हे विधान ऐकून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना हसू अनावर झाले होते.