महायुती म्हणून लढायला अजित पवार गट तयार; बैठकीनंतर पदाधिकाऱ्याच्या सुनील तटकरे यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 10:50 IST2025-12-20T10:49:39+5:302025-12-20T10:50:20+5:30
महायुतीबाबत स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतर भाजप प्रभारींशी चर्चा करत आहे.

महायुती म्हणून लढायला अजित पवार गट तयार; बैठकीनंतर पदाधिकाऱ्याच्या सुनील तटकरे यांचे संकेत
मुंबई : २९ राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, अजित पवार गटाने त्यादृष्टीने निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला प्रत्येक जिल्ह्यात नेमलेले समन्वयक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
महायुतीसंदर्भात आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक अपेक्षित आहे. ती बैठक झाली तर राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जाण्याबाबत धोरण ठरविले जाईल, असे सुनील तटकरे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
महायुतीबाबत स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतर भाजप प्रभारींशी चर्चा करत आहे. त्यामुळे या सर्व निवडणुका महायुती म्हणून लढण्याचे धोरण ठरेल, असे तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले.
स्थानिक पातळीवर मित्र पक्षांशी झालेल्या चर्चेचा तपशील घेतला समजून
पक्षाच्या बैठकीत विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई व ठाणे विभागातील कल्याण डोंबिवली, ठाणे शहर, मिरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिका क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत राजकीय परिस्थिती आणि महायुती म्हणून सामोरे जाताना नेमकी कोणती पावले उचलली गेली पाहिजेत, याबाबत चर्चा झाली. तसेच आतापर्यंत त्या-त्या महापालिकेत मित्रपक्षांशी झालेल्या चर्चेचा तपशील तटकरे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांकडून घेतला.