विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:25 IST2025-09-11T15:25:20+5:302025-09-11T15:25:39+5:30
Ajit Pawar : दोन दिवसांपासून अजितदादा प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांती घेत होते

विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून IPS अंजना कृष्णा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्यातच दोन-तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांची प्रकृती खराब असल्याने त्यांनी कार्यक्रमही रद्द केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता विश्रांतीनंतर अजित पवार गुरूवारी अँक्शन मोडमध्ये आल्याचे दिसले. "अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा. यावर भर द्या," असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले. तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावा अजित पवार यांनी घेतला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाबद्दल आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी आढावा बैठक पार पडली. यावेळी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी कोणत्याही व्यवसायाकरिता बँकेमार्फत रु. १५ लाखांच्या मर्यादेत घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा… pic.twitter.com/O59yBsJTLG
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 11, 2025
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा. या योजनांची माहिती गरजूंपर्यंत योग्य प्रकारे पोहोचविणे ही महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगून, योजनांचा प्रचार-प्रसार प्रभावीपणे करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये तसेच योग्य लाभार्थ्यांची निवड करून त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी यासाठी यंत्रणांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या विविध विषयांवर आज संबंधित अधिकाऱ्यांशी आढावा बैठक पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, संशोधन, स्वाधार योजना, परदेशी शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह… pic.twitter.com/APalpmkXNN
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 11, 2025
महामंडळाच्या योजनांमुळे तरुणांना व्यवसाय, उद्योग व उद्यमशीलतेसाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे राज्यात स्वयंरोजगाराच्या संधी वाढीस लागून आर्थिक प्रगतीला चालना मिळते. त्यामुळे या योजना अधिक प्रभावीपणे राबवून त्याचे परिणाम समाजाच्या तळागाळापर्यंत दिसून यावेत, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करण्याच्या सूचना देतानाच यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावा घेतला. 'सारथी' मार्फत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, संशोधन, स्वाधार योजना, परदेशी शिष्यवृत्ती योजना व वसतिगृह यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास व प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे. तसेच मुलांच्या शिक्षण व प्रगतीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.