मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:22 IST2025-06-14T10:21:31+5:302025-06-14T10:22:03+5:30
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत बळी गेलेली एअर होस्टेस मैथिली मोरेश्वर पाटील (वय २२) ही पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील. मैथिलीचे अवघं कुटुंब, नातेवाईक शोकसागरात बुडून गेले आहे. मैथिली आपल्यातून कायमची निघून गेली आहे, ही दुर्दैवी बाब स्वीकारण्यास ते अद्यापही तयार नाहीत.

मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
- मधुकर ठाकूर
उरण (रायगड) - अहमदाबाद विमान दुर्घटनेत बळी गेलेली एअर होस्टेस मैथिली मोरेश्वर पाटील (वय २२) ही पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील. मैथिलीचे अवघं कुटुंब, नातेवाईक शोकसागरात बुडून गेले आहे. मैथिली आपल्यातून कायमची निघून गेली आहे, ही दुर्दैवी बाब स्वीकारण्यास ते अद्यापही तयार नाहीत. कुठेही असली तरी ती नक्कीच परत येईल, या भाबड्या आशेवर मैथिलीच्या परत येण्याकडे ते डोळे लावून बसले आहेत.
मैथिली पाटील ही न्हावा येथे आई-वडील आणि दोन लहान भावंडांसह राहत होती. सध्या मैथिलीचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात मिळण्याच्या प्रतीक्षेत अहमदाबाद येथे आहेत.
कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून आबालवृद्धांनी तिच्या घरी हजेरी लावली. मैथिली शांत, संयमी आणि मेहनती होती. तिला नृत्य, गायनाबरोबरच भजनाचीही आवड होती. सध्या मैथिलीचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात मिळण्याच्या प्रतीक्षेत अहमदाबाद येथे आहे.
न्हावा गावातील होती पहिलीवहिली एअर होस्टेस
न्हावा गावातील पहिलीवहिली एअर होस्टेस म्हणून मैथिली परिचित होती. तिने टी. एस. रेहमान शाळेत शिक्षण घेतले. यादरम्यान तिने एअर होस्टेस होण्याचे स्वप्न बाळगले.
आर्थिक स्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनीही तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसली. बारावीनंतर प्रतिकूल परिस्थितीत मैथिलीने एअर होस्टेसचा अभ्यासक्रम पूर्ण केला.दोन वर्षांपासून ती एअर इंडियात एअर होस्टेस म्हणून कामावर रुजू झाली होती, अशी माहिती माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी दिली.