अहमदनगर - सुमो जीपमधून ९५ लाख पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 20:33 IST2016-11-17T20:33:51+5:302016-11-17T20:33:51+5:30
कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पाथर्डीपासून २ किलोमीटर अंतरावरील बाबा पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत एका सुमो जीपमधून ९५ लाख रूपयांची

अहमदनगर - सुमो जीपमधून ९५ लाख पकडले
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि. १७- कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पाथर्डीपासून २ किलोमीटर अंतरावरील बाबा पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत एका सुमो जीपमधून ९५ लाख रूपयांची गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रक्कम जप्त केली. एक हजार व पाचशे रुपये मूल्याच्या या नोटा होत्या.
याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही रक्कम पाथर्डी तालुक्यातील एका राष्ट्रीयीकृत बँकेची असल्याची खात्री झाल्यानंतर संबंधितांना ती परत देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तालुक्यातील चिंचपूर येथे महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. या बँकेत जमा झालेल्या पाचशे व हजारांच्या नोटा घेऊन शाखा व्यवस्थापक व कर्मचारी खाजगी गाडीने ही रक्कम घेऊन पाथर्डी येथील मुख्य शाखेत जमा करण्यासाठी निघाले होते. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील पाथर्डी-बीड रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती.
नाकाबंदीत ही जीप थांबवून पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्यात हजार व पाचशेंच्या नोटांचा मोठा साठा सापडला. एवढी मोठी रक्कम सापडल्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ही जीप पोलीस ठाण्यात आणली. तेव्हा जीपमध्ये असलेल्या शाखा व्यवस्थापकाचे ओळखपत्र घाईघाईत विसरल्याने त्यांची ओळख न पटल्याने ही गडबड झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी जीपमधील बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची व नोटांची खात्री केली. या नोटांवर महाराष्ट्र बँकेच्या चिंचपूर शाखेचा शिक्का होता. ही रक्कम या बँकेचीच असल्याची खात्री झाल्यानंतर ती संबंधितांना परत देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पाथर्डी पोलिसांनी कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर दोन चेकपोस्ट तसेच शेवगाव रस्त्यावर व मोहटा रस्त्यावर एक चेक पोस्ट लावलेले आहेत. सध्या पाथर्डी येथे नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे पोलिसांना सापडलेली ही रक्कम निवडणुकीसाठीची होती, अशी अफवा शहरात सुरू झाली होती. पण पोलिसांनीच रक्कम बँकेचीच असल्याचा निर्वाळा दिल्याने चर्चेस पूर्णविराम मिळाला.